

बारामती : पुढारी वृत्तसेवा: वाकी (ता. बारामती) येथील शेतकरी गणेश किसन जगताप यांनी घेतलेल्या रताळे पिकात एकच रताळे तब्बल सव्वाआठ किलो वजनाचे मिळाले आहे. या रताळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. शेवग्याच्या अर्धा एकर शेतात आंतरपीक म्हणून जगताप यांनी घरीच उपयोगी पडावे, यासाठी रताळे पीक घेतले होते. सहा महिन्यांपूर्वी लावलेली रताळी उशिरा काढणी केल्यामुळे वाढीस लागून सव्वाआठ किलोचे रताळे तयार झाले आहे.
जगताप हे शेतात विविध प्रयोग करीत असतात. शेवगा, उसासह त्यांनी जिरेनियम या शेतीचा प्रयोग देखील राबविला आहे. बागायती पट्ट्यात पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकरी आता उसासह अन्य पिकांकडे वळला आहे. विविध प्रकारच्या पालेभाज्यांसह शेतात फळे, फुले, तरकारी पिके आदींचे उत्पन्न घेतले जात असून, यातून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. एवढे मोठे रताळे निघण्याची पश्चिम भागातील ही पहिलीच वेळ असल्याने अनेकांनी रताळे बघण्यासाठी गर्दी केली होती.
हेही वाचा