मलठण येथे होतेय वाहतूक कोंडी; संथ गतीने होणार्‍या कामाचा परिणाम | पुढारी

मलठण येथे होतेय वाहतूक कोंडी; संथ गतीने होणार्‍या कामाचा परिणाम

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा: मलठण (ता. शिरूर) येथे गावठाणातील सिमेंट रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत असून, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी, वेळ लागत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम करत असताना अडचणी येत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग त्या कधी सोडवणार याकडे मलठणकरांचे लक्ष लागलेले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता रखडलेला असून गावठाणातील या रस्त्यावरच मंगळवारी आठवडे बाजार भरत असल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी अडचण निर्माण होत आहे. शिरूर येथून मंचर, नारायणगाव, राजगुरुनगर येथे जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते.

या रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने लगत असलेल्या दुकानदारांच्या दुकानात तसेच जवळच्या घरांमध्ये धूळ मोठ्या प्रमाणावर जात असून, नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी तातडीने लक्ष देऊन अडचणी सोडवून लवकरात लवकर काम रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी मलठणचे ग्रामस्थ करीत आहेत.

हेही वाचा

नगर : घरगुती गॅस सिलिंडरचा व्यवसायासाठी गैरवापर

इचलकरंजीचा पाणी पुरवठा विस्कळीत होणार

माळेगाव पोलिस ठाणे सुरू करण्याच्या हालचाली; अधिसूचना प्रसिद्ध

 

Back to top button