मोठी बातमी! अग्निवीरांच्या भरतीसाठी जुलैपासून नोंदणी, आठवी पास उमेदवारांना संधी, अधिसूचना जारी | पुढारी

मोठी बातमी! अग्निवीरांच्या भरतीसाठी जुलैपासून नोंदणी, आठवी पास उमेदवारांना संधी, अधिसूचना जारी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भारतीय लष्कराने अग्निवीरांच्या भरती रॅलीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यासाठी जुलैपासून नोंदणी सुरू होणार आहे. अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी सक्तीची आहे. अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर क्लर्क/ स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समॅन या पदांसाठी भरती होणार आहे. विशेष म्हणजे ८ वी पास उमेदवारांना अग्निवीर भरतीसाठी संधी मिळणार असल्याचे अधिसूचनेत नमूद केले आहे.

Indian Army  ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवारांची भरती ४ वर्षांसाठी असेल. या काळात ३० दिवसांची सुट्टी मिळेल. पहिल्या वर्षी ३० हजार वेतन आणि भत्ता, दुसऱ्या वर्षी ३३ हजार वेतन आणि भत्ता, तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये वेतन आणि भत्ता तर शेवटच्या वर्षात ४० हजार वेतन आणि भत्ता मिळेल.

या पदांसाठी होणार भरती

अग्निवीर जनरल ड्यूटी
अग्निवीर टेक्निकल (Aviation/ Ammunition)
अग्निवीर क्‍लर्क/ स्‍टोअरकीपर टेक्निकल
अग्निवीर ट्रेड्‌समॅन दहावी पास
अग्निवीर ट्रेड्‌समॅन ८वी पास

दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयापाठोपाठ केंद्रीय संरक्षण मंत्रालयानेही आपल्या अंतर्गत विविध विभागांतून अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षे पूर्ण करणार्‍या अग्निवीरांना शनिवारी १० टक्के आरक्षण नुकतेच जाहीर केले होते. ‘भारतीय कोस्ट गार्ड’सह ‘डिफेन्स सिव्हिलियन’मध्ये अग्निवीरांना संधी मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्णयांतर्गत अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) तसेच ‘आसाम रायफल्स’मधील भरतीत १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत.

सीएपीएफ तसेच आसाम रायफल्समधील भरतीत कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात येईल. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला ही सूट पाच वर्षांची असेल, असे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भरतीच्या नियमांत आणखी काही बदल लवकरच केले जातील. सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांनाही अग्निवीरांना संधी मिळाव्यात म्हणून बदल करण्यास सांगितले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
लष्कर भरतीसंबंधी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला देशातील विविध राज्यांमध्ये विरोध केला जात आहे. योजना मागे घेण्याची मागणी करीत आंदोलक तरुण आक्रमक झाले आहेत. आंदोलकांचा रोष शांत करण्यासाठी केंद्र सरकारने हा नवा निर्णय जाहीर केला होता. सध्याच्या नियमानुसार केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये माजी सैनिकांसाठी १० टक्के कोटा आहे.

‘अग्निपथ’ची घोषणा करताना प्रवेशाची वयोमर्यादा १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे अशी निश्चित केली होती. पंरतु, देशभरात होणारे आंदोलन आणि गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्याची दखल घेऊन २०२२ मधील अग्निपथ योजनेतील भरतीसाठी कमाल वयोमर्यादा २३ वर्षे करण्यात आली. पुढील आठवड्यात २४ जूनपासून हवाई दलात अग्निवीरांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होईल. अग्निवीरांच्या पहिल्या बॅचमधून २५ टक्के जणांना लष्कराच्या कायम सेवेत सामावून घेतले जाईल व उर्वरितांनाही अन्यत्र आरक्षणासह विविध लाभ दिले जातील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, ‘अग्निपथ’ योजनेविरोधात विविध संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या ( Agnipath Yojana Protest ) पार्श्वभूमीवर दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात सोमवारी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठिकठिकाणी करण्यात आलेले बॅरिकेडिंग आणि पोलिस तपासणी मोहिमेमुळे दिल्ली – एनसीआरमधील वाहतूक कोलमडून गेली.

Back to top button