अमित शाह यांचा नाशिक दौरा अचानक रद्द, त्यांच्या ऐवजी येणार ‘हे’ मंत्री | पुढारी

अमित शाह यांचा नाशिक दौरा अचानक रद्द, त्यांच्या ऐवजी येणार 'हे' मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मंगळवार (दि.19)चा नाशिक दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या गैरहजेरीत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे त्र्यंबकेश्वर येथील योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ना. शाह यांच्या दौरा रद्दमागील कारण गुलदस्त्यात असले तरी देशभरात ’अग्निपथ’वरून सुरू असलेल्या वादाची त्यामागे किनार असल्याची चर्चा आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभरातील 75 ऐतिहासिक ठिकाणी मंगळवारी (दि.20) आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 75 ठिकाणांमध्ये नाशिकच्या त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे. याठिकाणी होणार्‍या योग दिन कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री शाह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. त्यासाठी शाह हे सोमवारी (दि.20) नाशिक मुक्कामी येणार होते. त्र्यंबकेश्वर येथे योग दिन कार्यक्रमानंतर शाह यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजन तसेच समर्थ गुरुपीठप्रणीत मोरे दादा चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयाचे भूमिपूजन सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार असल्याने भाजप पदाधिकार्‍यांमध्ये उत्साह होता. दरम्यान, दौर्‍याच्या निमित्ताने प्रशासनाने तयारीत कोणतीही कसूर ठेवली नाही. पण केंद्रीय गृहमंत्रालयाने रविवारी (दि.19) स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधत शाह यांचा दौरा रद्द केल्याचे कळविण्यात आले.

गृहमंत्री शाह यांच्या अनुपस्थितीत गृहराज्यमंत्री राय हे त्र्यंबकेश्वरमधील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. गृहमंत्रालयाने शाह यांचा दौरा रद्द करण्यामागील कारण स्पष्ट केलेले नाही. परंतु, केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून उत्तर भारतामधील वातावरण सध्या तापले आहे. बिहार, पंजाब, हरियाणासह काही राज्यांमध्ये जाळपोळ व अनुचित घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रातही या योजनेला काहीसा विरोध होऊ लागला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी शाह यांचा दौरा रद्द केल्याची चर्चा रंगली आहे.
प्रशासनाला काहीसा दिलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नाशिक दौर्‍यासाठी गेल्या आठवड्याभरापासून प्रशासनाने जय्यत तयारी केली. कार्यक्रमस्थळी वॉटरप्रुफ मंडप उभारणीपासून ते सुरक्षिततेपर्यंतच्या सर्व बाबींवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले. पण ऐनवेळी शाह यांचा दौरा रद्द झाल्याचा निरोप आला. त्यामुळे आठवडाभरापासून तयारीत गुंतलेल्या प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौर्‍यात बदल झाला आहे. ना. शाह यांच्याऐवजी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हे नाशिकला येत आहे. राय यांचा दौरा यांचा अधिकृत दौरा प्राप्त झाल्यानंतर नियोजित कार्यक्रमांविषयीची स्पष्टता होईल.
– भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी,

हेही वाचा :

Back to top button