पंढरपूरची आषाढी वारी ‘निर्मल’ होण्यास मदत | पुढारी

पंढरपूरची आषाढी वारी ‘निर्मल’ होण्यास मदत

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
पंढरपूरला जाणार्‍या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना 2 कोटी 59 लाख 75 हजार रुपये तसेच वारकरी भाविकांना तात्पुरत्या स्वच्छता, सुविधा पुरविण्यासाठी 6 कोटी 73 लाख 20 हजार रुपयांच्या निधीस राज्य शासनाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली. या निधीमुळे पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी मदत होणार असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना अनुदानाची मागणी केली होती. आषाढी एकादशीच्या निमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार्‍या पालखींसोबत असणार्‍या वारकर्‍यांना सुविधा पुरविण्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गावरील विविध ग्रामपंचायतींना 2 कोटी 59 लाख 75 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी स्वत: उपलब्ध करून ग्रामपंचायतींना मागणीनुसार द्यावयाचा आहे. पुणे जिल्हा परिषदेला 82 लाख रुपये, सातारा जिल्हा परिषदेला 20 लाख 25 हजार रुपये तर सोलापूर जि.प.ला 1 कोटी 57 लाख 50 हजार इतका निधी वितरित करण्यात येणार आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

भाविकांसाठी तात्पुरती शौचालये

पुणे सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणार्‍या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणार्‍या भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी 6 कोटी 73 लाख 20 हजारांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला देण्यास मान्यता दिली आहे. एकूण मंजुरीच्या 20 टक्के प्रमाणात म्हणजेच 1 कोटी 34 लाख 64 हजारांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आल्याचेही मुश्रीफ म्हणाले.

Back to top button