ब्रिटिशकालीन वारणा पूल ’नाबाद 141’ वर्षे

ब्रिटिशकालीन वारणा पूल ’नाबाद 141’ वर्षे

किणी ; राजकुमार बा. चौगुले : स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कोल्हापूर – सांगली जिल्ह्यांना महामार्गाने जोडणार्‍या ब्रिटिशकालीन वारणा नदीच्या पुलाने रविवारी तब्बल 141 वर्षे पूर्ण करून शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल केली. आतापर्यंत कोट्यवधी वाहनांचा भार सोसलेला पूल आजही भक्कमपणे उभा आहे.

ब्रिटिशकालीन राजवटीतही अस्तित्वात असणार्‍या या महामार्गाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या महामार्गावरील वारणा नदीवर पुलाची गरज ओळखून ब्रिटिश राजवटीने सर फिलिप वूड या गव्हर्नरच्या काळात जानेवारी 1876 मध्ये या पुलासाठी सर्वेक्षण करून बांधकामास सुरुवात केली. हे काम एका ब्रिटिश कंपनीलाच देण्यात आले होते.

दगड, माती व शिसे यांचाच वापर याच्या बांधकामासाठी करण्यात आला. स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या पुलास प्रत्येकी 45 मीटर रुंदीचे आठ गाळे आहेत. हे सर्व गाळे भक्कम दगडात बांधले असून, प्रत्येक वक्राकार गाळ्याला 'कि स्टोन' आहे. याच 'कि स्टोन'द्वारे हे गाळे भक्कम करण्यात आले. 400 मीटर लांबीच्या या पुलाचे काम 1881 ला पूर्ण झाले. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कारकिर्दीत पूर्णत्वास गेलेल्या या पुलाचे 20 जून 1881 रोजी उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

पूल उभारताना त्याचे जीवनमान 100 वर्षे गृहीत धरण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर हा पूल कालबाह्य झाल्याचे संबंधित ब्रिटिश शासनाने व कंपनीने शासनास कळविले असल्याचे जाणकार सांगतात. पुणे-बंगळुरू महामार्गाच्या रुंदीकरणावेळी जुन्या वारणा पुलाला समांतर नवीन पूल बांधण्यात आला; पण पुण्याकडे जाणार्‍या लेनसाठी जुन्याच महामार्गाचा वापर करण्यात येत आहे.
महाड दुर्घटनेनंतर स्ट्रक्चरल ऑडिट

2 ऑगस्ट 2016 साली महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानंतर राज्यातील सर्वच ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार या पुलाचे व्हीजेटी इन्स्टिट्यूट (मुंबई) या संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले. यासाठी अत्याधुनिक चाचणी यंत्राद्वारे पुलाच्या स्थितीचे अवलोकन करण्याबरोबरच पुलाची भार सोसण्याची क्षमताही (स्पॅन लोड टेस्ट) तपासण्यात आली, यानंतर हा पूल भक्कम असल्याचा निर्वाळा देण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news