नाशिक : गावठी कट्टे बाळगणाऱ्या टोळक्याला ठोकल्या बेड्या, देवळाली कॅम्प पोलिसांची कामगिरी | पुढारी

नाशिक : गावठी कट्टे बाळगणाऱ्या टोळक्याला ठोकल्या बेड्या, देवळाली कॅम्प पोलिसांची कामगिरी

नाशिक /देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

देवळाली कॅम्प, भगूर परिसरात गावठी कट्टे बाळगणाऱ्या टोळीला देवळाली कॅम्प पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे तसेच ५३ हजार रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांना भगूर, विजय नगरयेथील सम्राट हॉटेलजवळ पाच ते सहा तरुण गावठी कट्टे घेऊन जमले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रात्रगस्त अधिकारी लियाकत पठाण व गुन्हे शोथ पथकाचे अंमलदार, बिट मार्शल्स तसेच पेट्रोलिंग अंमलदार यांनी सम्राट हॉटेलजवळ सापळा रचून, संबंधित तरुणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे तीन जिवंत काडतुसे तसेच ५३ हजार रुपये रोख असा मुद्देमाल आढळला. या वेळी प्रशांत नानासाहेब जाधव (वय २५, देवळाली गाव), आतिश कैलास निकम (वय २५, रोकडोबा वाडी, देवळाली गाव), सागर किसन कोकणे (वय २४, चेहडी पंपिंग स्टेशन), रोहन संजय माने (वय २१, गायकवाड मळा), रेहमान जाफर शेख (वय २२, राजवाडा, देवळाली गाव), गौरव बाळासाहेब फडोळ (वय २२, सुभाष रोड, नाशिकरोड) यांना ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपआयुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माइनकर यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात भेट दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुंदन जाधव यांनी सहायक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, प्रकाश गिते यांच्या मदतीने या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक संदेश पाडवी यांच्याकडे दिला असून, या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button