मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नॅशनल हेरॉल्डप्रकरणी चार दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयामार्फत काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल गांधी यांची चौकशी सुरू आहे. त्या निषेधार्थ मालेगाव शहर काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी (दि. 17) जेल भरो आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु, पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बॅरिकेडिंग करून हा मोर्चा रोखला. या ठिकाणीच निवेदन स्वीकारून आंदोलकांना माघारी फिरविण्यात आले.
शहर जिल्हाध्यक्ष एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. किदवाई रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयातून मोर्चा निघाला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांधी यांना ईडीमार्फत नाहक त्रास दिला जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.
चौकशीच्या नावाने राष्ट्रीय नेत्यांना दिवसभर बसवून ठेवले जाणे गैर आहे. ज्या प्रकरणाची फाइल 2017 मध्येच बंद करण्यात आली आहे. त्या प्रकरणाला केवळ राजकीय स्वार्थ्यासाठी उचल देण्याच्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, अशी टीका बेग यांनी केली. अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिनिधीने निवेदन स्वीकारले. याप्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.