‘अग्‍निपथ’ला विरोध होत असताना अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

‘अग्‍निपथ’ला विरोध होत असताना अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : लष्कर भरतीसाठी नव्याने जाहीर करण्यात आलेल्या अग्‍निपथ योजनेच्या विरोधात (Agneepath Scheme Protest) देशभरात हिंसाचार सुरूच आहे. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सेवेत ४ वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी (Agniveers) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) आणि आसाम रायफल्समधील (Assam Rifles) भरतीसाठी १० टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने (HMO India) घेतला आहे. अग्निवीरांना दोन दलात भरतीसाठी उच्च वयोमर्यादेपेक्षा ३ वर्ष वयाची सूट दिली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढे ५ वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेअंतर्गत नव्याने भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती. पंरतु, गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्याची दखल घेत, सरकारने २०२२ साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयामध्ये यंदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, २०२२ अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे अशी करण्यात आली आहे.

या योजने विरोधात मात्र देशभरातील तरूण रस्त्यावर उतरले आहेत. ही योजना मागे घेण्याची मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. अशात वयोमर्यादेत वाढ केल्याने तरुणांनी लष्कर भरतीकडे लक्ष देण्याचे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच केले. तरुणांच्या भविष्याची चिंता करीत त्यांच्याप्रती संवेदनशीलता दाखवल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

अवघ्या काही दिवसांमध्ये लष्करभरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. अशात तरुणांनी त्यांची तयारी सुरू करण्याचे आवाहन सिंह यांनी केले आहे.पंतप्रधानांच्या निर्देशांनूसार केंद्र सरकारने यंदा लष्करभरतीच्या वयोमर्यादा २१ वरून २३ पर्यंत वाढवल्याने अनेक तरुण 'अग्निवीर' बनण्यास पात्र ठरतील.अग्निपथ योजना तरुणांना देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी जुळण्याची तसेच देशसेवा करण्याची सुर्वण संधी देईल. गेल्या दोन वर्षात लष्करभरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही.अशात योजनेमुळे अनेक युवकांना यंदा लष्करात भरती होण्याची संधी मिळेल, असे सिंह म्हणाले.

या वर्षी योजनेतील वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाईल असे स्पष्ट करीत अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात सामील होण्याच्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी एका निवेदनातून केले आहे. वयोमर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळे आमच्या अनेक उत्साही आणि देशभक्त तरुणांना संधी मिळेल, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news