Nandurbar : नदीला आलेल्या पुरात तीन चिमुकले वाहून गेले..,गाव पाडे सुन्न झाले | पुढारी

Nandurbar : नदीला आलेल्या पुरात तीन चिमुकले वाहून गेले..,गाव पाडे सुन्न झाले

नंदुरबार (पुढारी वृत्तसेवा)

धडगाव तालुक्यातील एका नदीला आलेल्या पुरात चार ते पाच वर्षीय वयाचे तीन मुले वाहून गेल्याची धक्कादायक दुर्घटना घडली असून या घटनेने तेथील गाव पाडे सुन्न झाले आहे. आज गुरुवार रोजी ही घटना चर्चेत आली.

अतिदुर्गम भागातील घटना असल्यामुळे प्रशासनालाही माहिती मिळविण्यात अडथळे आले. तथापि याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी घटनेला दुजोरा दिला. आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार निलेश दीलवर पाडवी (वय 4 वर्षे), मेहेर दिलवर पाडवी (वय 5 वर्ष), पार्वती अशोक पाडवी (वय 5 वर्ष) अशी मयतांची नावे आहेत.

धडगाव तालुक्यातील कुंडलचा मालपाडा येथे देवानंद नदी आहे. दि. 15 जून रोजी दुपारी ही नदी ओलांडताना या तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. हे चिमुकले देवानंद नदी ओलांडून दुसऱ्या पाड्यावरील किराणा दुकानात बिस्किट वगैरे खाऊ घेण्यासाठी निघाले होते, मात्र वाहत्या पाण्यात तोल गेला आणि खोल खड्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला. काल बुधवार रोजी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात नोंद करणे चालू होते.

हेही वाचा :

Back to top button