ज्या शाळेत शिपाई: तेथेच प्राचार्य; सोमेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मिंड यांची निवड | पुढारी

ज्या शाळेत शिपाई: तेथेच प्राचार्य; सोमेश्वर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी मिंड यांची निवड

सोमेश्वरनगर, पुढारी वृत्तसेवा: येथील सोमेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी बाळासाहेब मिंड यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मिंड यांनी याच शाळेत शिपाई, शिक्षक व आता प्राचार्य, असा थक्क करणारा प्रवास केला आहे. यामुळे परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) गावचे रहिवासी असलेले मिंड यांनी सांगितले की, बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या वेळचे सोमेश्वर कारखान्याचे संचालक कै. रामचंद्र भगत यांनी सोमेश्वर विद्यालयात शिपाई पदावर नोकरीवर लावले. घरची व शेतीची जबाबदारी असल्याने शिपाई म्हणून रात्रपाळीत काम केले.

यावरच न थांबता पुढे शिक्षण करायचे, हा चंग बांधून पूर्वी काकडे महाविद्यालय हे सकाळच्या सत्रात सोमेश्वर विद्यालयाच्या इमारतीतच भरत होते, तेथे शिक्षण केले. सकाळी महाविद्यालय, दिवसभर शेतीची कामे, तर रात्रपाळीत सोमेश्वर विद्यालयात शिपाई म्हणून काम केले.
1989 ला एमएचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र, शिक्षणाची गोडी काही शांत बसू देत नव्हती.

सत्तारूढ गटाला कपबशी, विरोधकांना विमान चिन्ह

1989 ला बी. एड.ला प्रवेश घेतला व ते शिक्षण पूर्ण करताच ज्या शाळेत शिपाई म्हणून कामे केले, त्याच शाळेत 1991 ला इतिहासाचा शिक्षक म्हणून नोकरीस लागलो. विद्यार्थ्यांसाठी वेगळे काही तरी करण्याची संधी यानिमित्ताने मिळाल्याची प्रतिक्रिया निवडीनंतर मिंड यांनी दिली.

नोकरीची 37 वर्षे पूर्ण करून आज त्याच शाळेचा प्राचार्य म्हणून धुरा सांभाळताना आनंद होत असल्याचे बाळासाहेब मिंड यांनी सांगितले. याबद्दल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शैलेश रासकर, सचिव भारत खोमणे यांनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा 

सत्तारूढ गटाला कपबशी, विरोधकांना विमान चिन्ह

पिंपरी : शहरात 25 जिजाऊ क्लिनिक

कोल्हापूरच्या ‘सिरी’ स्टार्टअपचा ‘भारत- क्रोएशिया स्टार्टअप ब्रिज’मध्ये डंका

Back to top button