नाशिक : ‘मविप्र’ संस्थेमध्ये उपाध्यक्षपदाची निर्मिती, घटना दुरुस्तीवर शिक्कामोर्तब | पुढारी

नाशिक : ‘मविप्र’ संस्थेमध्ये उपाध्यक्षपदाची निर्मिती, घटना दुरुस्तीवर शिक्कामोर्तब

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील प्रमुख अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कार्यकारी मंडळात उपाध्यक्षपदाची पुन्हा निर्मिती करण्यात येणार आहे. विशेष सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्ती अहवालाला सभासदांनी बहुमताने मंजुरी देऊन शिक्कामोर्तब केले. पदनिर्मितीमुळे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्यासह प्रादेशिक समतोल व अधिकार्‍यांचे विकेंद्रीकरण होईल, अशी अपेक्षा सभासदांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी निवडणुकीपासून कार्यकारी मंडळातील पदाधिकार्‍यांची संख्या एकने वाढणार आहे.

मराठा हायस्कूलच्या प्रांगणातील कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात मंगळवारी (दि.14) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. व्यासपीठावर संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार, आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे, सभापती माणिक बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, अशोक पवार, डॉ. जयंत पवार, प्रल्हाद गडाख, डॉ. प्रशांत देवरे, हेमंत वाजे, अशोक पवार, डॉ. विश्राम निकम, सचिन पिंगळे, प्रा. नानासाहेब दाते, नंदा सोनवणे, डॉ. शोभा बच्छाव, श्रीराम शेटे, बाळासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष पदनिर्मितीच्या ठरावाचे वाचन सभापती बोरस्ते यांनी केले. उपस्थित सभासदांनी दोन्ही हात उंचावून ठराव मंजूर केला. अशोक नाईकवाडे, भास्कर बनकर, डॉ. आत्माराम कुंभार्डे, अभिमन्यू सूर्यवंशी, कैलास सूर्यवंशी, राजेंद्र पवार, अंबादास बनकर, धनंजय राहणे, लक्ष्मण देशमुख, रवींद्र मोरे, ज. ल. पाटील, विजय वाघ, निवृत्ती महाले, कैलास बोरसे, अशोक थोरात आदींनी उपाध्यक्षपदाच्या मागणीला पाठिंबा दिला, तर नीलिमा आहेर, अ‍ॅड. विजय गटकळ यांच्यासह काही सभासदांनी उपाध्यक्षपदाच्या निर्मितीबाबत प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, सभेत मान्यवरांच्या हस्ते रौंदळ कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे शिक्षणाधिकारी सी. डी. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक नाना महाले यांनी आभार मानले.

मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी
मविप्र कार्यकारिणी मंडळाच्या पदाधिकार्‍यांची संख्या कमी असल्याने सभासदांना अडचणी येतात. सभासदांच्या पाल्यांना संस्थेत नोकरीत रुजू करून घेण्याची गरज आहे. मविप्र संस्थेत नोकरी देताना 20 टक्के जागा मराठा समाजातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्याची मागणी मालेगाव येथील तुळशीराम हिरे यांनी केली.

सभासदांच्या मागणीनुसार तसेच कार्यकारिणी मंडळाच्या मंजुरीनंतर उपाध्यक्षपद निर्मितीच्या घटना दुरुस्तीसाठी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या पाच बैठका पार पडल्या असून, 128 सभासदांनी सूचना मांडल्या होत्या. त्यापैकी चार उपाध्यक्षपद निर्मितीला विरोध दर्शविला होता. विशेष सर्वसाधारण सभेत घटना दुरुस्ती अहवालाला बहुमताने मंजुरी मिळाली आहे. हा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला जाईल.
– नीलिमाताई पवार, सरचिटणीस, मविप्र

उपाध्यक्षपद निर्मितीला नव्हे तर प्रक्रियेला विरोध आहे. निवडणुकीच्या तोंडावर पद निर्मिती केली जात आहे. कार्यकारी मंडळात पदाधिकार्‍यांची संख्या विषम असावी लागते. मात्र, आता सहा पदाधिकारी होणार आहेत. हे घटनात्मकदृष्ट्या चुकीचे असून, सभासदांच्या डोळ्यात धूळफेक आहे. संस्थेची सत्ता एका कुटुंबाकडे केंद्रित झाली आहे. विद्यमान अध्यक्षांवर कार्यकारी मंडळाचा विश्वास नाही का?
– अ‍ॅड. नितीन ठाकरे,
माजी सभापती

हेही वाचा :

Back to top button