संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट शक्य | पुढारी

संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट शक्य

  • नवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा :  संसदेचे पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या काळात होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संरक्षण मंत्री आणि लोकसभेतील भाजपचे उपनेते राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदेतील प्रकरणांच्या मंत्रिमंडळ समितीने या कालावधीत अधिवेशन आयोजित करण्याची शिफारस केली आहे. या काळात 17 दिवस संसदेचे कामकाज चालू शकते.

याच अधिवेशन काळात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूकही होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीची घोषणा केली आहे. तर उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी अद्याप कोणताही कार्यक्रम घोषित केलेला नाही. राष्ट्रपती निवडणूक 18 जुलैला होणार असून 21 जुलैला निकाल असेल.

उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांचा कार्यकाळ 10 ऑगस्ट रोजी संपत आहे. गत अधिवेशनात तपासणीसाठी पाठवलेल्या किमान 4 विधेयकांसह इतर विधेयके पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याची सरकारची योजना आहे. काँग्रेस नेत्यांवरील ईडीच्या कारवाईमुळे पावसाळी अधिवेशनात मोठा गदारोळही होऊ शकतो. तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकर्‍यांचे मुद्दे, चीनचा सीमावाद या मुद्यांवर विरोधक सरकारला घेरू शकतात.

Back to top button