लवंगी मिरची : कौल | पुढारी

लवंगी मिरची : कौल

आज मी भयंकर, जाम, बेहद्द, काहीच्या काही खूश आहे बाबा!
कशामुळे चिरंजीव?
अहो, निकाल जाहीर झाला, मी निवडून आलोसुद्धा!
काय सांगतोस? बँकेची इलेक्शन ना? तुमचं ‘सर्वोन्नती’ पॅनेल जिंकलं वाटतं?
संपूर्ण पॅनेल नाही आलं निवडून; पण मी जिंकलो.
जिंकलास खरा; पण विजयी झालास का?
हा काय प्रश्न आहे बाबा?

विजयी झालो म्हणजे जिंकलो, म्हणजे निवडून आलो! उगाच शाब्दिक कीस कशाला पाडायचा बाबा?
शास्त्र असतं ते! आम्हा पेपरवाल्यांना विचारा. खूप पाहिल्यात निवडणुका, जय, पराजय. कव्हरही केल्यात.
आमचेही बँकेचे रिझल्टस् येतीलच पुढे-मागे पेपरला. मी माझा एक छान फोटो तयारच ठेवलाय.
तू तुझी मतपत्रिका कोणाकोणाला दाखवलीस?
तेे काय पदक होतं का दाखवत सुटायला?
तसं नाही, तू तुझ्या पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवलीस की नाही ती? नियमानुसार?
नियम होता का? मग, केलंच असेल त्याप्रमाणे.
दुसर्‍या पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवली नाहीस ना?
दोघं जर शेजारीच बसले असले, तर ओझरती नजर टाकून बघितली असेलही दुसर्‍याने. एवढं काय त्यात?
आक्षेप किंवा हरकत घेतली की, कळेल लेका तुला.
त्यावरून आक्षेप येईल? येऊ शकतो.
बाबो, आता निकाल घोषित झाल्यावरही आक्षेप?
तुझा कार्यकाळ संपेपर्यंतही वोलतीलतील. शास्त्र बनत चाललंय तेही! बरं, तू तुझी पत्रिका योग्य त्या ठिकाणी दिली होतीस का?
असेल बहुतेक.

आठव. नेमलेल्या प्रतिनिधीच्या हातीच दिलीस ना? का ऐर्‍यागैर्‍यांचे हात लागले तिला?
अहो बाबा, लहानपणी आंबे खाताना तुम्ही सारखे रागवायचात. शर्टाला आंब्याचे हात लावू नका. डाग पडतील. तसे डाग पाडणारे हात असणार का दुसर्‍यांच्या प्रतिनिधींचे? उगाच का शंका उकरून काढताय?
तांत्रिक मुद्द्यांवरून तुझ्या विजयाला कोणी हरकत घेऊ नये म्हणून बोलतोय बरं!
थँक्यू. जाऊ मी? आमच्या पॅनेलतर्फे जंगी पार्टी करणार आहेत आम्हा काहींच्या विजयाची.
आणखी एक, तुम्ही घोडेबाजार तर नाही ना केलात?
आता तेवढंच राहिलंय बोलायचं.असं आहे, तू जिंकण्याचा गंभीर अपराध केलाहेस. आता आपल्या कर्माची फळं भोगावीच लागणार तुला.
आणखी काय काय होऊ शकेल पिताश्री?

संबंधित बातम्या

तुझी मतपत्रिका बाद होती, तुझ्या पॅनेलने मुद्दाम दुसर्‍याला अडकवला, तुला मुळी पहिल्या क्रमांकाची मतंच मिळाली नाहीत, तू ठरवलेल्या अंतरापेक्षा एक इंच कमी किंवा एक इंच जास्त अंतरावरून मतपत्रिका दाखवलीस, असे मुद्देही निघू शकतील. तयारीत राहा.
बाबा, मतदारांनी माझ्या बाजूने रीतसर कौल दिला एवढं पुरेसं नाही का हो?
नाही. लोकशाही आहे ना आपली? आपण नेहमी गोंधळ घालण्याला, लोकांच्या मनात गोंधळ माजवायला कौल देतो. पराभव उमदेपणाने स्वीकारावा, त्यापासून धडा घ्यावा आणि लगेच पुढच्या कामाला लागावं, हे भान आपल्याला कुठलं उरायला? वानरं जशी उड्या मारमारून छतावरची कौलं फोडतात ना, तसे शाब्दिक कोलांट्या मारत जनमताचा कौल फोडण्याशिवाय दुसरं काय करणार आपण?

– झटका 

Back to top button