पिंपरी : पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातून परदेशात जाणार्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. परदेशात वाहन चालविण्यासाठी लागणारा 'आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना' बरेच नागरिक शहरातूनच काढत आहेत. गेल्या संपूर्ण वर्षभरात 397 वाहन परवाने काढले आहेत.
मात्र यावर्षात पाच महिन्यातील आकडेवारी 377 एवढी आहे आणि पुढील संपूर्ण महिनाभराचा विचार करता गेल्या वर्षीहून अधिक परवाने या वर्षाच्या सहा महिन्यातच काढले जातील. असा अंदाज उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभरात आरटीओच्या महसुलात दुप्पट वाढ होण्याचे संकेत आहेत.
आरटीओने गेल्या आठवडाभरापूर्वी नागरिकांचा वेळ वाचावा आणि कामकाजाची प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना ही सेवा देखील आहे. परदेशात शिक्षण आणि रोजगारासाठी गेलेल्या नागरिकांना त्या त्या देशातील किंवा आंतरराष्ट्रीय परवाना काढणे सक्तिचे आहे.
याची वैधता एका वर्षाची आहे. यासाठी आरटीओ एक हजार रूपये एवढा शुल्क आकारत आहे. आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवाना मिळण्यासाठी पासपोर्टवर व्हिसाची नोंद आवश्यक आहे. गेल्या चार वर्षापासून आतापर्यंत साडे एकोणाविस लाखाहून अधिक महसूल आरटीओला मिळाला आहे. दरवर्षाला पाच ते सहा लाखापर्यंतचा महसुल परवान्यामधून प्राप्त झाला आहे.
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परवान्यासाठीच्या अर्जात वाढ होत आहे. गेल्या वर्षीहून अधिक परवाने या वर्षी काढले जातील अशी शक्यता आहे. या वर्षी पाच महिन्यातच मागील वर्षीच्या तुलनेत अधिक परवाने काढले गेले आहेत.
– अतुल आदे, परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक कार्यालय, मोशी
वर्ष परवाने महसुल
2018 376 3,76,000
2019 623 6,23,000
2020 179 1,79,000
2021 397 3,97,000
2022 377 3,77,000
मे पर्यंत
एकूण 1952 19,52,000