नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ऑनलाइन फसवणुकीत 'वन टाइम पासवर्ड' (ओटीपी) दिल्यानंतर बँक खातेधारकाच्या खात्यातील पैसे दुसर्या खात्यात वर्ग होत असतात. मात्र, एका भामट्याने नागरिकास गंडा घालताना ओटीपी न घेताही ऑनलाइन पद्धतीने क्रेडिट कार्डवरून परस्पर तीन लाख रुपयांचे व्यवहार करून गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाइपलाइन रोडवरील गुलमोहर कॉलनीतील रहिवासी अनिल गोपीचंद चव्हाण (43) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. अनिल यांच्या फिर्यादीनुसार 17 मे रोजी सायंकाळी संशयिताने त्यांना कॉल करून क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट घेण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी भामट्याने अनिल यांना रिवॉर्ड पॉइंट डॉट इन या संकेतस्थळाची लिंक देत त्यावर क्रेडिट कार्ड, जन्मदिनांक, ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांक देण्यास सांगितला. त्यानुसार अनिल यांनी माहिती भरली. त्यानंतर अनिल यांच्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी आला, मात्र त्यांनी तो ओटीपी क्रमांक भरला नाही किंवा भामट्यास सांगितला नाही. तरीदेखील अनिल यांच्या क्रेडिट कार्डवरून तीन लाख रुपयांचे व्यवहार झाले. यानंतर अनिल यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली.