नाशिकमधून 1400 सेना कार्यकर्ते अयोध्येला रवाना | पुढारी

नाशिकमधून 1400 सेना कार्यकर्ते अयोध्येला रवाना

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील सुमारे 1400 कार्यकर्ते, पदाधिकारी सोमवारी (दि.13)सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास नाशिकरोड स्थानकातून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. मंत्री आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे बुधवारी (दि. 15) अयोध्येचा दौरा करणार आहेत. हा दौरा संस्मरणीय करण्यासाठी कार्यकर्ते अयोध्येला रवाना झाले.

‘जय श्रीराम’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, विनायक पांडे, सुनील बागूल, नितीन चिडे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, भगवान आरोटे, वैभव ठाकरे, योगेश गाडेकर, कुमार पगारे, विक्रम खरोटे, राजू वाघसरे उपस्थित होते. दरम्यान, काही कार्यकर्ते राहिल्यामुळे ओढ्याला गाडी थांबवून त्यांना नाशिकरोडहून चारचाकी वाहनांनी तेथे पोहोचविण्यात आले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते आदी पदाधिकारी अयोध्येत दोन दिवस अगोदरच दाखल झाले आहेत. शिवसैनिकांची निवासाची व्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

पदाधिकारी नितीन चिडे यांनी सांगितले की, रेल्वेगाडीत कार्यकर्त्यांना चहा-नाश्ता, भोजन देण्यासाठी नाशिकचे केटरर्स व त्याचे सत्तर कर्मचारी यांची सुविधा देण्यात आली आहे. प्रत्येक बोगीसाठी तीन कर्मचारी आहेत. नाशिक पूर्व, देवळाली अशा 14 मतदारसंघनिहाय स्वतंत्र बोगीमधून कार्यकर्त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत त्या-त्या भागातील माजी नगरसेवक आहेत.

हेही वाचा :

Back to top button