

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा
सोमवारी दै. 'पुढारी'च्या 'माय कोल्हापूर'मधील पहिल्या पानावर 'पंचगंगा की गटारगंगा' अशा मथळ्याखाली पंचगंगा नदीचे विदारक छायाचित्र प्रसिद्ध झाले आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले. सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत राजाराम बंधारा येथील पंचगंगा नदीपात्राची कसबा बावड्याकडील बाजू आणि पंचगंगा घाट कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने चकाचक करण्यात आला.
जय भवानी गल्ली, दत्त मंदिर रोड झोपडपट्टी परिसर येथील सांडपाणी मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीत थेट मिसळते. गेली अनेक वर्षे अनेकवेळा यावर माध्यमांतून बातम्या प्रसिद्ध झाल्या; पण कोल्हापूर महानगरपालिकेने यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. परिणामी, पंचगंगा नदी प्रदूषणात भर पडतच राहिली. महानगरपालिकास्तरावर केवळ सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वळवण्यासाठी कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू आहे.
गेल्या चार-पाच दिवसांत राजाराम बंधारा ग्रुप आणि बीआरएफ ग्रुप यांच्या वतीने घाट व नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. घाटाच्या स्वच्छतेबरोबर नदीपात्रात अडकलेले पावसाळ्यातील वृक्ष पाण्याबाहेर काढण्याचे काम करण्यात आले. बंधार्याच्या दक्षिणेला सांडपाणी थेट नदीत मिसळते, बंधार्यापासून उत्तरेला काही अंतरावर मोठा नाला पंचगंगा नदीपात्रात मिसळतो, याचा पंचनामा अनेकवेळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी केला आहे; पण पुढे कारवाई शून्य.