नाशिकमध्ये जमिनींच्या व्यवहारात ब्रोकर लॉबी, प्लॉटचे दर वाढण्यामागे हेच कारणीभूत | पुढारी

नाशिकमध्ये जमिनींच्या व्यवहारात ब्रोकर लॉबी, प्लॉटचे दर वाढण्यामागे हेच कारणीभूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सध्या शहराच्या पाथर्डी फाटा, आडगाव नाका, पिंपळगाव बहुला, सातपूर, गंगापूर रोड, पेठ रोड, मखमलाबाद नाका, नाशिकरोड या भागांतील जागेचे दर गगनाला भिडल्याने, मध्यमवर्गीयांना एखादा गुंठा जागा घेणे दुरापस्त होत आहे. जमिनीच्या दरवाढीला बाहेरून आलेल्या मार्केटिंग कंपन्या कारणीभूत असून, त्यांच्या ब्रोकर्सने प्लॉट्स खरेदी-विक्री कमिशनच्या नावे ग्राहकांची सर्रास फसवणूक सुरू केली आहे. मूळ मालकांकडून कमी दरात जमीन विक्रीची जबाबदारी घेत ग्राहकांना तीच जमीन चढ्या दरात विकली जात असल्याने, शहरातील जमिनींच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत.

‘नो ब्रोकरेज’ च्या नावाखाली सध्या अनेक मार्केटिंग कंपन्या नाशिकमध्ये स्थिरावल्या आहेत. या कंपन्यांनी डेव्हलपर्सच्या नावे कार्यालये उघडून जमिनी खरेदी-विक्रीचे व्यवहार काबीज केले आहेत. या कंपन्यांची जमिनीचे व्यवहार करण्याची खास पद्धत आहे. कंपन्यांचे ब—ोकर मूळ जमीनमालकाकडून 9 ते 10 हजार रुपये प्रतिवार याप्रमाणे व्यवहार निश्चित करतात. ग्राहकांना मात्र 14 ते 15 हजार प्रतिवार याप्रमाणे विक्री करतात. जवळपास पाच ते सहा हजार रुपये चढ्या दराने व्यवहार केले जात असल्याने, सध्या शहराच्या चहूबाजूने जमिनीचे दर अवाच्या सवा वाढले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे एकाही जमिनीची मालकी या कंपन्यांची नाही. मात्र, अशातही दर निश्चितीचे सर्व अधिकार आपल्याजवळ ठेवून हे ब्रोकर्स ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. ज्या पद्धतीने व्यवहार सुरू आहेत, त्यावरून पुढच्या एक-दोन वर्षांत नाशिकमधील जमिनींच्या किमती तिप्पट वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आडगाव परिसरात वर्षभरापूर्वी 6 ते 7 हजार प्रतिवार याप्रमाणे भाव होते. मात्र, या भागात मार्केटिंग कंपन्यांचे जाळे पसरल्याने आज या ठिकाणी 15 ते 16 हजार रुपये दर सुरू आहे. या भागात सध्या जमिनीला मागणी असल्याने, लवकरच या दरांमध्येही वाढ होण्याचीही शक्यता आहे. हीच स्थिती मखमलाबाद नाका, पाथर्डी फाटा, त्र्यंबकेश्वर रोड या भागाची आहे. दरम्यान, या सर्व प्रकारांमधून ग्राहकांची मात्र चांगलीच लूट होत असून, आता याविरोधात काही मंडळींकडून आवाज उठविण्याची तयारी केली जात आहे. या कंपन्यांना विरोध करून थेट जमीनमालकांशी व्यवहार करण्यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे.

दोन टक्के कमिशन
जमीनमालकासोबत व्यवहार करताना ब्रोकरकडून एकूण व्यवहाराच्या किमतीवर दोन टक्के कमिशन आकारले जाते. तसेच ग्राहकांकडूनही हे ब्रोकर दोन टक्के कमिशन उकळतात. मात्र, हा व्यवहार कमिशनपलीकडचा असतो. मालकाकडून जमिनीचा भाव तोडून घेऊन ग्राहकाला अवाच्या सवा किमतीत विकणे हा ब—ोकरचा मूळ उद्देश असतो.

गुन्हेगारच ब्रोकर्स 
ब्रोकर्स रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. मात्र बहुतांश ब्रोकर्स अनधिकृतपणे या व्यवसायात पडले असून, ग्राहकांची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार यांच्याकडून केले जात आहेत. यात पैसा अधिक असल्याने, गुन्हेगारी वृत्तीची मंडळीदेखील या व्यवसायात मोठ्या संख्येने आहेत.

भूखंडांची इत्थंभूत माहिती
ब्रोकर ज्या परिसरावर लक्ष केंद्रित करतात, त्या परिसरातील विक्रीस असलेल्या सर्व जमिनी, मालमत्तांची इत्थंभूत माहिती ब—ोकर्सकडे असते. एखाद्या जमिनीचा वाद असेल, त्याचीही माहिती ब्रोकरकडे असते. त्याचबरोबर सर्व्हे नंबर, प्लॉट नंबर याचीही नोंद ब्रोकर ठेवतात. त्यामुळे ग्राहक ब्रोकर्सची मदत घेऊन व्यवहार पूर्ण करण्यास प्राधान्य देतात. मात्र त्यातून त्यांची फसवणूक होते.

गुंतवणूकदार कमी किमतीत भूखंड घेतात. त्यात प्लॉटिंग करतात अन् ब्रोकरच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा किमतींमध्ये ते ग्राहकांना विकतात. या धोरणामुळे नाशिकमधील जमिनीच्या किमती अचानक वाढल्या असून, ग्राहकांची फसवणूक होत आहे.
– रवी साळवे, ग्राहक

हेही वाचा :

Back to top button