नंदुरबार (पुढारी वृत्तसेवा) :
मांस विक्रेत्यांनी टाकून दिलेले अवशेष खाण्यासाठी जमणाऱ्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात एक नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. रात्रीच्या अंधारात आड रस्त्याला हे घडत असतानाच कर्तव्य बजावून परतणाऱ्या पोलिसाला ते निदर्शनास पडताच ऍम्ब्युलन्स बोलावून तातडीने उपचार मिळवून दिले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गावातील काही चिकन-मटण विक्रेते टाकाऊ अवशेष आणि उरलेल्या मांसाचे तुकडे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शहरालगतच्या रिलायन्स मॉल, गजानन महाराज मंदिर परिसरात फेकून जातात. त्यामुळे तिथे भटक्या कुत्र्यांचा नेहमी जणू मेळा भरतो. शुक्रवारी रात्री 8.30 वाजता राजू गवळी हे रस्त्याने जात असताना अचानक काही कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले. त्यांचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. त्याच प्रसंगी पोलीस नाईक मोहनराव सुर्यवंशी हे कर्तव्य बजावून घरी जात होते. त्यांनी जखमी व्यक्तीला पाहताच धाव घेतली. संपूर्ण घटना लक्षात येताच 108 वर संपर्क करून रुग्णवाहिका बोलावली व इतर नागरिकांच्या मदतीने बसवून उपचारार्थ रवाना केले. नंदुरबार जिल्हा दलातील पोलिस कर्मचाऱ्याने अशाप्रकारे माणुसकीचे दर्शन घडवले. यामुळे नागरिकांनी धन्यवाद दिले. पोलिस नाईक मोहनराव सूर्यवंशी हे सातत्याने समाजसेवी कार्यात उपक्रमात सहभागी असतात.
दरम्यान, नंदुरबार शहराच्या वेगवेगळ्या भागात इतस्ततः फेकले जाणारे मांसाचे तुकडे आणि त्यामुळे दहशत माजवत झुंडीने फिरणारे कुत्रे, हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. तीन वर्षांपूर्वी कुत्र्यांच्या अशा हल्ल्यात एका मुलीने जीव गमावला होता. तर त्यापुर्वी देखील लहान मुलांवर असे हल्ले झाले होते.
शहरालगतच्या रिलायन्स मॉल, गजानन महाराज मंदिर परिसरात माऊस विक्रेत्यांनी टाकून दिलेले अवशेष खाण्यासाठी जमणाऱ्या भटक्या कुत्र्यांमुळे आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात घडलेत. येथे नागरिकांची वर्दळ अधिक असल्याने असे हल्ले नागरिकांच्या जीवावर बितू शकतात. म्हणून या परिसरात चिकन-मटणचा कचरा फेकणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.