नगर: जिल्ह्यात दोन महिन्यांत पालिका निवडणुकांची रणधुमाळी; प्रभागरचनेनंतर सोमवारी आरक्षण सोडत

नगर: जिल्ह्यात दोन महिन्यांत पालिका निवडणुकांची रणधुमाळी; प्रभागरचनेनंतर सोमवारी आरक्षण सोडत

नगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव व जामखेड नगरपरिषद तसेच नेवासा नगरपंचायतीची अंतिम प्रभागरचना प्रसिध्द झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी नगरपरिषद सदस्यपदांच्या आरक्षण सोडतीची नोटीस प्रसिध्द केली आहे. त्यानुसार 13 जून रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदा व नेवासा नगरपंचायत यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी जोरात सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक नगरपरिषदेची प्रभागरचना तयार करण्यात येऊन अंतिम प्रभागरचना प्रसिध्द करण्यात आली. अंतिम प्रभागरचना प्रसिध्द होत नाही तोच आयोगाने नगरपालिका सदस्यांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जारी केला. आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आरक्षण सोडत कार्यक्रमाची नोटीस जिल्हाधिकारी कार्यालय तसेच संबंधित नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे.

प्रत्येक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी 13 जून रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला प्रवर्गाचे आरक्षण सोडत काढणार आहेत. आरक्षणावर हरकती व सूचना मागण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले हे 15 जून रोजी आरक्षणाची सूचना संकेतस्थळावर प्रसिध्द करणार आहेत.

नागरिकांना आरक्षण व सोडतीवर 15 ते 21 जून 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 24 जूनपर्यंत जिल्हाधिकारी आरक्षण व सोडतीचा अहवाल विभागीय आयुक्त तथा नगरपरिषद विभागाचे प्रादेशिक संचालक यांच्याकडे पाठविणार आहेत. विभागीय आयुक्त 29 जूनपर्यंत सदस्यपदांच्या आरक्षणास मान्यता देणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भोसले सदस्यपदांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपरिषदांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news