नगर : मुकादमानेच पळविले टोळी मालकाला, अपहृत टोळी मालकाला शोधण्यात यश | पुढारी

नगर : मुकादमानेच पळविले टोळी मालकाला, अपहृत टोळी मालकाला शोधण्यात यश

कर्जत : पुढारी वृत्तसेवा: उचल घेऊनही ऊसतोड मुकादम टोळी घेऊन उसतोडीला आलाच नाही, घेतलेली उचल परत केली नाही, म्हणून टोळी मालकाने मुकादमास घरी जाण्यास मज्जाव केल्याच्या, अशा घटना नेहमीच कानावर पडतात. मात्र परजिल्ह्यातील एखाद्या मुकादमानेच टोळी मालकाला त्याच्या गावाकडे पळवून नेले तर? प्रत्येकाला प्रश्न पडेल की असे होऊ शकते का?

पण.. खरंच असा प्रकार कर्जत तालुक्यात घडला आहे. अपहृत टोळी मालकाचा शोध घेऊन पोलिसांनी त्यास सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात दिले. त्याचे झाले असे, कर्जत तालुक्यातील गणेशवाडी गावातील टोळी मालक सुभाष बापु ठोंबरे (वय 41) हे आणि डोळे मुकदम आणि काही कामगार सोबत होते अचानक ऊस तोडणी पैशांच्या कारणावरून टोळी मुकादम उपेंद्र दिलीप मोरे (रा.पिंपरखेड ता.चाळीसगाव जि. जळगाव) याने चक्क टोळी मालकाच्या इलाख्यातून पळवून नेल्याची घटना दि.26 मे रोजी दुपारी घडली होती.

सांगली : म्हैसाळ जलसिंचन योजनेतील ६५ गावे तहानलेलीच

अपहरण झालेल्या टोळी मालकाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात त्याच दिवशी अपहरण केल्या प्रकरणी भा.द.वी कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुभाष ठोंबरे यांचे अपहरण केल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. कर्जत पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू असताना कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना गुन्ह्यातील अपहरण झालेली व्यक्ती सुभाष ठोंबरे हे सुरुवातीला नेवासा व नंतर पिंपरखेड ता.चाळीसगाव येथे असल्याची बातमी मिळाली होती.

पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ पोलीस ठाण्यातील पोलीस पथक रवाना करून तेथील स्थानिक पोलीस निरीक्षक श्री संजय मेंढे व पोलीस स्टाफ व गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीने अपहरण झालेली व्यक्ती सुभाष ठोंबरे यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी आरोपी पळून गेले, त्यानंतर कर्जत पोलिसांनी ठोंबरे यांना कर्जत येथे आणून नातेवाईकांच्या सुखरूप ताब्यात दिले. त्यामुळे ठोंबरे कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव,सहायक फौजदार तुळशीदास सातपुते, पोलीस नाईक संभाजी वाबळे, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे,अर्जुन पोकळे, देविदास पळसे, संपत शिंदे यांनी केली असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक संभाजी वाबळे हे करीत आहेत.

अपहरणाचा छडा लावण्यात हातखंडा!
खेळाच्या गेममध्ये प्रभावित होऊन, वेगवेगळ्या प्रेमप्रकरणात, अल्पवयीन मुले-मुली फुस लावून पळवून नेल्यानंतर किंवा घरगुती कारणावरून वाद झाल्यानंतर अगदी मध्यप्रदेशापर्यंत निघून गेलेल्यांना कृतिशील चंद्रशेखर यादव यांनी कल्पकतेने तपास लावून ताब्यात घेतले आहे. अशा अनेक किचकट शोधमोहिमा त्यांनी यशस्वी केल्या आहेत. त्यांच्या या हातखंड्याचे कौतुक होत आहे.

Back to top button