नाशिक : विनापरवानगी वृक्षतोड केल्याने खासदार पुत्राला सव्वाचार लाखांचा दंड | पुढारी

नाशिक : विनापरवानगी वृक्षतोड केल्याने खासदार पुत्राला सव्वाचार लाखांचा दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खा. हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य गोडसे आणि योगेश ताजनपुरे यांनी इमारतीच्या बांधकामासाठी वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी न घेताच तब्बल सात वृक्षांची अवैध कत्तल केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार स्थानिकांनी महापालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतर महापालिकेने गोडसे, ताजनपुरे यांना चार लाख 20 हजारांचा दंड केला. तसेच उद्यान विभागाने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलिसांना पत्र दिले आहे.

नागरी क्षेत्रात कोणत्याही मिळकतीमधील झाडांचे संरक्षण व संवर्धनासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन अधिनियम कायदा 1975 व सुधारणा अधिनियम 2021 पारित केला आहे. त्यानुसार वृक्षप्राधिकरण समितीच्या परवानगीशिवाय वृक्षतोड अवैध मानली जाते. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र.19 मधील देवळाली शिवारातील सर्व्हे नं.193-20 ब, न्यू बालाजी हॉटेल ढाब्याशेजारी असलेल्या खर्जुल मळ्यातील जागेत विविध प्रजातींचे वृक्ष होते. परंतु, अजिंक्य गोडसे आणि ताजनपुरे यांनी या ठिकाणी इमारत उभी करण्यासाठी पालिकेची परवानगी न घेताच सात वृक्षांची तोड केली. यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने तातडीने येथील वृक्षतोड थांबवून ट्रकसह साहित्य जप्त केले आहे. तसेच गोडसे आणि ताजनपुरे यांना अवैध वृक्षतोड केल्याप्रकरणी चार लाख 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्रही दिले आहे.

अवैध वृक्षतोड प्रकरणी अजिंक्य गोडसे व योगेश ताजनपुरे यांना चार लाख 20 हजारांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्याकडील साहित्य जप्त केले असून, नाशिकरोड पोलिसांत जमा केले आहे. तसेच गोडसे, ताजनपुरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिले आहे.
– विजयकुमार मुंडे, उपआयुक्त, उद्यान, मनपा

हेही वाचा :

Back to top button