नव्या शैक्षणिक वर्षाचे शिवधनुष्य | पुढारी

नव्या शैक्षणिक वर्षाचे शिवधनुष्य

नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असली तरी कोरोनाचे सावट कायम आहे. मात्र आता शाळा बंद ठेवणे विद्यार्थ्यांपेक्षा व्यवस्थेला परवडणारे नसेल. कोरोनाकाळात लाखो मुलांनी पायाभूत क्षमता गमवल्याचे सर्वेक्षणात समोर आले. त्यामुळे अध्ययन क्षती भरून काढणे आणि त्या त्या इयत्तेच्या क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्याचे आव्हान शाळांपुढे असेल.

कोरोनाने जगभर धुमाकूळ घातल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मागील काळात जवळपास दोन वर्षे प्रत्यक्ष शालेय शिक्षण बंद होते. ऑनलाईन शिक्षणाचे प्रयत्न सुरू होते; मात्र त्या प्रयत्नांच्या मर्यादाही समोर आल्या. मागील शैक्षणिक वर्षात नोव्हेंबर-डिंसेबरमध्ये शाळा सुरू झाल्या. अवघ्या चार ते पाच महिने शाळा सुरू राहिल्या. या काळात मुलांना शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठीच्या प्रयत्नांपेक्षा विद्यार्थ्यांना शाळेशी जोडण्याचे मोठे आव्हान शाळा आणि शिक्षकांसमोर होते. ते काही प्रमाणात पेलले गेले; मात्र आता पुन्हा नव्याने शैक्षणिक वर्षाच्या आरंभीच कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. आता शाळा बंद ठेवणे विद्यार्थ्यांपेक्षा व्यवस्थेला परवडणारे नसेल. सध्या विद्यार्थ्यांची अध्ययन क्षती मोठ्या प्रमाणावर झाल्याचे चित्र आहे. ती भरून काढण्याचे मोठे आव्हान काही काळ पेलावे लागणार आहे. एकीकडे देशातील पाच कोटी मुलांना पायाभूत क्षमता नाही म्हणून यावर्षी निपुण भारत अभियानाची घोषणा झाली आहे. त्याचबरोबर कोरोना काळात लाखो मुलांनी पायाभूत क्षमता गमवल्या असल्याची बाब विविध सर्वेक्षणांत समोर आली. त्यामुळे याही वर्षी पुन्हा एकदा विद्या प्राधिकरणाने सेतू अभ्यासक्रमाची अमलबजावणी शाळेच्या आरंभापासून करण्याची घोषणा केली. शाळा सुरू होताना अध्ययन क्षती भरून काढणे आणि त्या त्या इयत्तेच्या क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त करून देण्याचे आव्हानदेखील पेलावे लागणार आहे.

शिक्षण विभागाने शाळा बंद न करता नियम पालन करत शाळा सुरू ठेवण्याची घोषणा केली. त्यामुळे शाळा आणि शिक्षकांना काहीसा दिलासा मिळाला. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे झालेले नुकसान भरून काढायचे आहे. शेवटी निर्धारित शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करताना मागील इयत्तांची गमावलेली क्षमता भरून काढताना अतिरिक्त वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अध्ययनाचे ओझे पडणार आहे. मात्र, पायाभूत क्षमता प्राप्त झाल्याशिवाय पुढे जाणेही अशक्य आहे. गेल्या सत्रात शिक्षकांनी पायाभूत स्वरूपाच्या क्षमतांवर काम केले. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले. आता शाळा सुरू होऊन पुन्हा शिकणे गतिमान होण्याची अपेक्षा आहे. कारण, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी कौशल्य विकसन अभ्यासक्रमात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या संधी विद्यार्थ्यांना न मिळाल्याने कौशल्य प्राप्त करण्यात अडचणी आल्या आहेत.

संबंधित बातम्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल सुमारे 95 टक्के लागला; मात्र त्याच वेळी राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणातून आपण काय कमविले आणि गमविले हेही समोर आले आहे. त्यामुळे शाळा सुरू राहतील, यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील. विद्यार्थ्यांना मागील इयत्तांच्या विविध विषयांच्या संकल्पना, क्षमता प्राप्त करून देण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. सध्या एक महिना सेतू अभ्यासक्रम राबवायचा आहे. वेळेचे नियोजन करत नियमित वर्गाच्या क्षमता प्राप्त करून देण्यासाठीचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. उद्योगात नुकसान भरून काढण्यासाठी पर्यायी मार्गांनी उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. शिक्षण क्षेत्रात तसे करता येत नाही. त्यामुळे मुलांच्या बालमानसशास्त्राचा विचार करत शिक्षण शास्त्रीय दृष्टिकोन, विविध उपक्रम, कृती तसेच इतर अध्ययन अनुभवाच्या आधारे झालेले नुकसान भरून काढण्याचे आव्हानही शिक्षकांना पेलावे लागणार आहे.

चालू शैक्षणिक वर्षात बालभारतीने एकात्मिक व द्विभाषिक पाठ्यपुस्तकाचा केलेला प्रयोग महत्त्वाचा ठरणार आहे. मागील वर्षी राज्यात निवडलेल्या आदर्श शाळांमध्ये ही पुस्तके पथदर्शक स्वरूपात उपयोगात आणली गेली. एकात्मिक आशयानुसार बालभारतीने हा पहिलाच प्रयोग केला. एकाच पाठ्यपुस्तकात, एकाच आशयात इतर विषयांशी सहसंबंध जोडून अध्ययन-अध्यापनाची प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे आशय एकच असला, तरी तो विविध विषयांच्या संदर्भाने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे शिकण्यात आशयाचे, माहितीचे असणारे ओझे आपोआप कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी पहिलीत चार संकल्पना निश्चित केल्या आहेत. त्यानुसार कुटुंब, पाणी, प्राणी व पक्षी, व्यावसायिक या संकल्पनेच्या सोबत विद्यार्थ्यांचे सर्व विषयांचा आशय जोडत शिकणे होणार आहे. याच संकल्पना यावर्षी दुसरीच्या वर्गाला घेऊन पाठ्यपुस्तक विकसित केले जाणार आहे. अर्थात, दुसरीचे पुस्तक यावर्षी केवळ आदर्श शाळांसाठी उपयोगात आणले जाणार आहे.

राज्यात मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये गेल्या 20 वर्षांपासून इंग्रजी विषय सक्तीचा केला आहे. त्याच बरोबर सेमी माध्यमात पहिली ते पाचवीच्या वर्गात केवळ गणित हा विषय इंग्रजीत शिकविला जातो, तर उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावर विज्ञान, गणित हे विषय इंग्रजी भाषेत शिकविले जातात. आता राज्यात पहिलीच्या पाठ्यपुस्तकात आशयाच्या संदर्भाने व्दिभाषिक स्वरूपाचा प्रयोग केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना इंग्रजीचा परिचय, शब्द संपत्तीची वृद्धी होण्यास मदत होणार आहे. असा प्रयत्न बालभारतीने प्रथमच केला आहे.

शिक्षणातील आव्हाने पेलण्यासाठी लागणारी मानसिकता शैक्षणिक व्यवस्थेच्या मनुष्यबळात निर्माण करण्याचे मोठे आव्हान असेल. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय स्तरावरच्या असलेल्या पर्यवेक्षकीय अधिकार्‍यांची रिक्त पदांची संख्या साठ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आहे त्या मनुष्यबळावर काम करणे व्यवस्थेला कठीण जात आहे. अशावेळी त्याचा परिणाम गुणवत्तेवर होताना दिसतो. पुरेसे मनुष्यबळ व तेही अधिक गुणवत्तेचे निर्माण करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात पी.जी.आय. या भारत सरकारच्या निर्देशांक अहवालात 51 गुणांची वृद्धी करण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केलेे. महाराष्ट्र हे शैक्षणिक क्षेत्रात प्रयोगशील म्हणून ओळखले जाते. ती पंरपरा आणि राज्याची असलेली ओळख यापुढच्या काळात कायम ठेवण्याचे शिवधनुष्य सर्वांसमोर आहे. गेल्या काही वर्षांत अनेक राज्ये महाराष्ट्राच्या पुढे जात आहेत. त्यादृष्टीने आपल्याही नियोजन आणि कार्यवाहीची पावले टाकण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील.

– संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ

Back to top button