नाशिकमध्ये मुसळधार, दुसर्या दिवशी जोर वाढला
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहर व परिसरात सलग दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.10) वादळी वारे आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर आलेल्या या पावसाने नाशिककरांची धांदल उडवली. तसेच महापालिकेच्या पावसाळी कामांची पोलखोल झाली. ग्रामीण भागात कळवणमध्ये मौजे विसापूर येथे वीज पडून 36 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सटाण्यातील केरसानेत वीज पडून बैलजोडी ठार झाली.
कोकणात मान्सून डेरेदाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली असली तरी मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. शुक्रवारी (दि.10) दिवसभर आभाळ दाटून आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास आकाशात काळे ढग तयार होऊन अवघ्या मिनिटांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसाने रस्ते जलमय झाले. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नाशिककरांची पंचाईत झाली. दरम्यान, या पावसाने शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरापर्यंत तो सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे मान्सूनपूर्व कामे पूर्ण केल्याचा महावितरणचा दावा साफ खोटा ठरला. ग्रामीण भागात कळवण व सटाण्यात मेघगर्जनेसह पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतकरीराजाची धावपळ उडाली. मौजे विसापूर (सटाणा) येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास वीज अंगावर पडल्याने बारकू गोपू सोनवणे (36) या इसमाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत वीज पडून तिघा इसमांचा मृत्यू झाला. दरम्यान, अन्य तालुक्यांमध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. पावसापासून शेतमाल वाचविण्यासाठी शेतकर्यांची लगबग सुरू होती.
पहिल्याच पावसाचा दणका :
जिल्ह्यात गुरुवारी (दि. 9) वादळी वार्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाले. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार वार्याने शेकडो झाडे उन्मळून पडली. तर 93 घरांची पडझड झाली असून 17 कांदाचाळी, 2 पोल्ट्री, 3 शेडनेटचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात 44 घरांचे नुकसान झाले. चांदवडमध्ये 27, नांदगाव 16 तर सिन्नर येथे 5 व नाशिक तालुक्यात एका घराचे नुकसान झाले. मनमाड परिसरात पावसाने 4 ते 5 कांदाशेड जमीनदोस्त झाले असून, इंडियन हायस्कूलच्या खोल्यांचे पत्रे उडाले. नांदगावला 2 पोल्ट्री शेडचे नुकसान झाले. पावसाने 7 जनावरेही दगावली. चांदवड तालुक्यातील 1 दुकान व 1 लॉन्स, तर नांदगावला 1 टपरी व शाळेचे पत्रे उडाले.
हेही वाचा :
- 'जलजीवन'ची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी! शासनाचा निर्णय
- सातारा : बुधवारपासून शाळांचे प्रत्यक्ष वर्ग भरणार
- सातारा जिल्ह्यातील 14 कृषि दुकानांचे परवाने निलंबित

