मौनी विद्यापीठ निवडणूक बिनविरोध, पालकमंत्री सतेज पाटील यांची एकहाती सत्ता | पुढारी

मौनी विद्यापीठ निवडणूक बिनविरोध, पालकमंत्री सतेज पाटील यांची एकहाती सत्ता

गारगोटी, पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री तथा मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष सतेज पाटील यांना मौनी विद्यापीठाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. तीन गटात केवळ तीनच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाली. आश्रयदाता सभासद गटातून सतेज. डी. पाटील, सामान्य सभासद गटातून मधुकर कुंडलिक देसाई, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी गटातून प्रा. अरविंद मारुती चौगले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. आर. डी. बेलेकर यांनी काम पाहिले.

या निवडणूकीसाठी इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. यामुळे निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. पालकमंत्री सतेज पाटील संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. संस्थेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आश्रयदाता गटातून १०, सामान्य सभासद गटातून १७, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी गटातून २० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज माघारीचा दिवस होता. मंत्री पाटील राज्यसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आहेत.

तरीही तालुक्यात बिनविरोध निवडीसाठी जोरदार हालचाली सुरू होत्या. याकामी सर्व आजी-माजी आमदारांनी सहकार्य केले. तर मंत्री पाटील यांचे विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्ते दोन-तीन दिवस मंत्री पाटील याकामी झटले होते. मंत्री पाटील यांच्या विनंतीला मान देत अनेकांनी माघार घेतल्याने बिनविरोध निवडीला यश आले.

हेही वाचलतं का?

Back to top button