पंढरपूर : निर्बंधमुक्‍त पंढरीत आषाढी वारी भरणार | पुढारी

पंढरपूर : निर्बंधमुक्‍त पंढरीत आषाढी वारी भरणार

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : 
दोन वर्षानंतर यंदा आषाढी वारीचा सोहळा निर्बंधामुक्त भव्य दिव्य करण्याच्या तयारीला प्रशासन लागले आहे. सध्यातरी आरोग्यमंत्री यात्रा भरवण्यावर ठाम आहेत तर पालकमंत्री देखील उत्सुक आहेत. मात्र, राज्यातील विविध जिल्ह्यात वाढत असलेले कोरोनाचे नवे संकट वारी सोहळ्यावर घोंगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध लागणार की, निर्बंधमुक्त साजरी होणार? असा प्रश्‍न वारकर्‍याच्या मनात आहे. मात्र, यंदाची आषाढी वारी भव्यदिव्य भरवण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे.

राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामूळे गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तर रूग्ण संख्या अधिक प्रमाणात वाढल्यास काही प्रमाणात का होईना निर्बंध लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

त्यानुसार वारीबाबत काय निर्णय होणार, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वारकर्‍यांनी मास्क वापरावा व लसीकरण करून घ्यावे, बूस्टर डोस घ्यावा, असे आवाहन ही केले आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरी भक्ताविना ओस पडली होती. त्यामुळे दोन वर्षापासून कोरोना महामारीच्या संकटात बंद झालेली वारी यंदा भव्य दिव्य व्हावी.

यासाठी खरीप हंगामातील कामे मार्गी लावून ग्रामीण भागात शेतकरी आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतो. चांगला पाऊस पडू दे, शेतशिवार हिरवागार होऊ दे, अशी विठ्ठलाकडे साकडं घालत हरिनामाचा गजर करत, टाळ मृदगांच्या तालावर नाचत वारकरी पंढरीकडे जात असतो. डोळे भरून पहावा अशा माऊलींच्या आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरीची आस लावून बसलेल्या लाखो वारकर्‍यांचे डोळे पंढरीकडे लागले आहेत. अशातच कोरोनाचे नवे संकट उभे रहात आहे. आतापर्यत अनेक वारकर्‍यांनी कोरोनाचे दोन डोस पुर्ण केले आहेत. तर बुस्टर डोस घेऊन वारकरी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे.

यंदाच्या आषाढी वारी सोहळ्याला 15 ते 16 लाख वारकरी सहभागी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. आषाढी वारीवर निर्बंध लावण्यापेक्षा वारकर्‍यांच्या आरोग्य व्यवस्थेसाठी पालखी मार्गावर सक्षम आरोग्यव्यवस्था उभी करावी. त्यामुळे विनाविघ्न आषाढी वारी सोहळा संपन्न होईल, असा विश्‍वास वारकरी व्यक्त करत आहेत.

सक्‍ती नसली तरी मास्क आवश्यक
दोन वर्षानंतर यंदा आषाढी वारीचा सोहळा निर्बंधामुक्त साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याला 16 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढती गर्दी लक्षात घेऊन मास्क वापरणे बंधनकारक नसले तरी गरजेचे आहे. लसीकरण, बुस्टर डोस घेत वारकर्‍यांनी सहभागी व्हावे व आरोग्य विभागाने उभारलेल्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करुन घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

Back to top button