नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
येथील रंगमहालातली ऐतिहासिक 'बारव' एकेकाळी दुष्काळी परिस्थितीत संपूर्ण तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठीचा एकमेव स्रोत होती. कालांतराने हा वाडा पुरातत्त्व विभागाकडे गेल्याने वाडा नूतनीकरण कामानिमित्त बंद राहिल्याने दुर्लक्षित झाला आहे. पर्यायाने आज मोठ्या प्रमाणावर परिसरात जंगलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुर्लक्षित बारव स्वच्छतेची मोहीम चांदवडच्या तरुणांनी हाती घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
जागतिक पर्यावरण दिन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान नाशिक विभाग व सह्याद्री प्रतिष्ठान चांदवड तालुक्याच्या सहकारी मंडळींनी रविवारी (दि.5) स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा वारसा जतन करण्याचे हे व्रत असल्याची भावना यावेळी सर्वच स्वयंसेवकांची होती. यावेळी नितीन शेळके, धनंजय निलसकर, योगेश पगार, मयूर बोरस्ते, तुषार झारोळे, समीर काळे यांनी पुढाकार घेतला व सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी श्रमदान केले.