Gupta brothers : दक्षिण आफ्रिकेतून फरार झालेल्या गुप्ता ब्रदर्सला UAE मध्ये अटक, काय आहे नेमकं प्रकरण? | पुढारी

Gupta brothers : दक्षिण आफ्रिकेतून फरार झालेल्या गुप्ता ब्रदर्सला UAE मध्ये अटक, काय आहे नेमकं प्रकरण?

जोहान्सबर्ग; पुढारी ऑनलाईन

दक्षिण आफ्रिकेतून (South Africa) फरार झालेल्या गुप्ता बंधूंना (Gupta brothers) युएईमध्ये (UAE) अटक करण्यात आली आहे. UAE च्या अधिकाऱ्यांनी राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता यांना अटक केली असल्याची माहिती दक्षिण आफ्रिका सरकारकडून देण्यात आली आहे. गुप्ता कुटुंबातील तिसरा भाऊ अजय याला अटक करण्यात आली आहे की नाही हे अद्याप झालेले नाही.

गुप्ता बंधूंचे (Gupta brothers) दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती जेकब झुमा (former president Jacob Zuma) यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांचा त्यांनी आर्थिक फायदा उठवल्याचा तसेच वरिष्ठ पातळ्यावरील नियुक्तींच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा गुप्ता बंधूंवर आरोप आहे. पण त्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

दक्षिण आफ्रिका सरकारच्या म्हणण्यानुसार, गुप्ता बंधू २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिका सोडून दुबईत स्व-निर्वासित झाले होते. कारण त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून अब्जावधी रँड (आफ्रिकेतील चलन) लुटले होते.

“दक्षिण आफ्रिकेच्या न्याय मंत्रालयाने पुष्टी केली आहे की, युएईमधील कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांकडून त्यांना माहिती मिळाली आहे की फरार असलेल्या राजेश आणि अतुल गुप्ता या दोघांना अटक करण्यात आली आहे.” असे न्याय मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

“यूएई आणि दक्षिण आफ्रिकेच्या कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्या एजन्सींशी चर्चा सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेचे नेहमीच UAE शी सहकार्य राहील,” असे त्यात म्हटले आहे. इंटरपोलने गुप्ता बंधूंना रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. अमेरिका आणि ब्रिटनने त्यांना देशात प्रवेश करण्यास बंदी घातली होती.

आफ्रिकेतील लोकांच्या मोठ्या विरोधामुळे झुमा यांना हटवून त्यांच्या जागी सिरिल रामाफोसा यांना काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून नियुक्त केले होते. त्याच दरम्यान गुप्ता कुटुंबाने २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून पलायन केले होते.

त्यांना भ्रष्ट प्रकरणांमध्ये विनाकारण अडकवल्याचा दावा करत जबाब देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत परत येणार नसल्याचे गुप्ता बंधूंनी २०१८ मध्ये चौकशी आयोगाला सांगितले होते.

सहारनपूर ते दक्षिण आफ्रिका प्रवास

गुप्ता कुटुंबीय हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील आहे. १९९० च्या दरम्यान त्यांनी दक्षिण आफ्रिकेत एक चपलांचे दुकान सुरु केले होते. त्यानंतर ते दक्षिण आफ्रिकेतच स्थायिक झाले. त्यानंतर गुप्ता परिवाराने आयटी, मीडिया आणि खाण कंपन्या सुरु केल्या. सध्या यातील बहुतांश कंपन्या विकल्या गेल्या आहेत. तर काही बंद पडल्या आहेत. या सर्व घोटाळ्यात बँक ऑफ बडोद्याचे समोर आले होते. गुप्ता बंधूंची बँक ऑफ बडोदाने मदत केल्याची माहिती समोर आली होती.

 

Back to top button