नगर : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या 85 गट व पंचायत समित्यांच्या 170 गणांच्या प्रारुप रचनेवर आजपर्यंत 6 हरकती दाखल झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील चार व राहुरी तालुक्यातील दोन हरकतींचा त्यात समावेश आहे. आमची गावे पूर्वीच्याच गट व गणांमध्येच समाविष्ट करण्यात यावेत, अशी मागणी या हरकतींव्दारे करण्यात आली आहे. आता हरकती दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून, प्रारुप रचनेवर किती हरकती दाखल होतात, याची उत्सुकता वाढली आहे.
राज्य शासनाने अकोले व पाथर्डी हे दोन तालुके वगळता उर्वरित 12 तालुक्यांत प्रत्येकी एक गट वाढविला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या 73 गटांची तोडफोड करुन नवीन 85 गट व 170 गण निर्माण करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा पुनर्वसन अधिकारी पल्लवी निर्मळ यांच्या दालनात हरकती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पहिले चार दिवस कोणीही हरकती दाखल करण्यासाठी फिरकले नाहीत. पाचव्या दिवशी सोमवारी (दि.6) मात्र, सहा हरकती दाखल झाल्या आहेत. उपलब्ध होणार्या हरकती व सूचनांचा अहवाल दररोज विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठविण्यात येत आहे. 8 जून 2022 पर्यंत हरकती स्वीकारण्यात येणार आहेत.
अकोले तालुक्यातील मुथाळणे, उंचखडक खुर्द या गावातून प्रत्येकी 1 तर कळस खुर्द गावातून दोन हरकती दाखल झाल्या आहेत. प्रारुप रचनेत मुथाळणे गाव समशेरपूर गटात टाकण्यात आले आहे. उंचखडक खुर्द हे गाव धुमाळवाडी गटात समाविष्ट केले. ही दोन्ही गावे पूर्वीच्या देवठाण गटातच समाविष्ट करावी, अशी मागणी आहे. अकोले तालुक्यातील कळस खुर्द हे गाव प्रारुप रचनेत धुमाळवाडीत समाविष्ट झाले आहे. हे गाव पूर्वीच्या देवठाण गटातच समाविष्ट करण्यात यावे यासाठी दोन हरकती दाखल झाल्या आहेत.
राहुरी तालुक्यातील बाभूळगाव येथून दोन हरकती दाखल झाल्या आहेत. प्रारुप रचनेत बाभूळगाव बारागाव नांदूर गटात समाविष्ट करण्यात आले आहे. गावकर्यांना हे अमान्य असून, हे गाव पूर्वीच्या वांबोरी गटात समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.
नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात 9 जून रोजी गट व गणांवर दाखल होणार्या हरकतींवर सुनावणी होणार आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे हरकतीधारकांची बाजू ऐकूण घेणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील उपस्थित राहाणार आहेत. हरकती दाखल करणार्यांना नाशिकला उपस्थित राहता येणार आहे.