एक झाड सोन्याचे! | पुढारी

एक झाड सोन्याचे!

बीजिंग ः आपल्याकडे दसर्‍याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची पद्धत आहे. त्यामुळे एका अर्थी आपण त्याला ‘सोन्याचे झाड’ असेही म्हणू शकतो. मात्र, चीनमध्ये एक झाड खरोखरच सोन्याची झळाळी लाभलेले आहे. ‘गोल्डन शॉवर’सारख्या झाडांची आठवण यावी असे हे पिवळेधमक झाड आहे. त्याच्या या पिवळ्या पानांची गळती सुरू झाली की ते पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात. वीस दिवसांच्या अवधीत या झाडाची पाने गळून खाली पडत असतात. या काळात ज्या मठाच्या आवारात हे झाड आहे त्याला सुमारे 60 हजार लोक भेट देतात. या मठाला भेट देण्यासाठी आधी ऑनलाईन बुकिंग करावे लागते.

हजारो लोक रांगेत उभे राहून हे अनोखे झाड पाहण्यासाठी येतात. तांग राजवंशाने हे झाड मठाच्या आवारात लावले होते असे सांगितले जाते. एका प्राचीन प्रजातीचे हे झाड आहे. त्याचा वापर अनेक पारंपरिक चिनी औषधांमध्येही होतो. हे झाड मठाच्या आवारात गेल्या 1400 वर्षांपासून असल्याचे म्हटले जाते. त्याच्या प्रजातीला ‘ऑटम गोल्ड’ किंवा ‘पानगळीचे सोने’ असे नाव आहे. ही प्रजाती 270 दशलक्ष वर्षे जुनी आहे. त्याची पाने गळून खाली पडली की सुवर्णमुद्रांचाच सडा पडल्यासारखे द़ृश्य दिसते.

Back to top button