नाशिक : कॅम्प मॉड्युलर रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स, मनुष्यबळ उपलब्ध होणार : कृषिमंत्री भुसे | पुढारी

नाशिक : कॅम्प मॉड्युलर रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर्स, मनुष्यबळ उपलब्ध होणार : कृषिमंत्री भुसे

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
कॅम्प रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ मानधन किंवा कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येईल. तज्ज्ञ डॉक्टरांकडूनही वैद्यकीय सेवा मिळवून दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्ट व मालेगाव महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्प येथील 100 खाटांचे मॉड्युलर रुग्णालयाचे लोकार्पण शनिवारी (दि. 4) झाले. यावेळी ते बोलत होते. शहर व परिसरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा देणार्‍या अत्याधुनिक व वातानुकूलित रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. या सुसज्ज वैद्यकीय सेवेने मालेगावच्या वैभवात आणखीच भर पडली असल्याचे कृषिमंत्र्यांनी नमूद केले. अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्टने सामाजिक दायित्व निधीतून साडेचार कोटी खर्चून या रुग्णालयाची उभारणी केली आहे. त्यासाठी जागा आणि पायाभूत स्ट्रक्चर महापालिकेने उभे करून दिले. रुग्णांच्या नातेवाइकांना बसण्याची व्यवस्था, वाहनतळ, पिण्याचे पाणी आदी सुविधा आहेत. त्याचप्रमाणे ‘आयसीयू’चे स्वतंत्र आठ बेड आहेत. खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर सुविधा असतील, असे सांगण्यात येत आहे. या रुग्णालयात स्वतंत्र डायलिसिस सेंटर उभारण्याचा मानस असल्याचे यावेळी कृषिमंत्री यांनी सांगितले. आयुक्त भालचंद्र गोसावी व आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी मनोगतून रुग्णालयाची सविस्तर माहिती दिली. यावेळी उपमहापौर नीलेश आहेर, अमेरिकेन इंडिया फाउंडेशनचे डायरेक्टर मॅथ्यू जोसेफ, महेश श्रीनिवास, आय. आय. केअरचे डायरेक्टर डॉ. संतोष भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, प्रभाग सभापती कल्पना वाघ, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा गंगावणे, माजी उपमहापौर सखाराम घोडके, भिकन शेळके आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button