नगर : ‘सीडी, ऑडिट, पोटनियम’ने गाजली जिल्हा परिषद कर्मचारी सभा

नगर ः झेडपी कर्मचारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माईकवर बोलण्यावरून सभासदांमध्ये सुरू असलेली ओढातानी
नगर ः झेडपी कर्मचारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माईकवर बोलण्यावरून सभासदांमध्ये सुरू असलेली ओढातानी
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा

मागील ऑनलाईन सभेची सीडी, संगणक विभागाचा लाखोंचा खर्च, ऑडिटसाठी केलेल्या दोन वेगवेगळ्या तरतुदी, इमारत देखभाल खर्च, नियमांना डावलून दिले जाणारे कर्ज, पोटनियम दुरुस्ती, कन्यादान योजना, मयत सभासद कर्जमाफी इत्यादी विषयांसह पारितोषिक वितरणातील मानापमान नाट्य आणि मंचावर बोलण्याच्या स्पर्धेत झालेली खेचाखेची व आरडाओरडी यामुळे काल झालेली जिल्हा परिषद कर्मचारी सभा चांगलीच गाजली.

अहमदनगर जिल्हा परिषद सर्व्हन्टस को. ऑप. के्रडिट सोसायटीची काल सकाळी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षणाधिकारी अशोक कडूस, तर व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विलास शेळके, उपाध्यक्ष काशीनाथ नरोडे, संचालक संजय कडूस, प्रशांत मोरे, अरुण जोर्वेकर, कल्याण मुटकुळे, सुरेखा महारनूर, ज्योती पवार आदी उपस्थित होते.

सभेची वेळ ही सकाळी 11.30 होती. मात्र, कर्मचारी सभासदांच्या गुणवंत मुलांचा पारितोषिक वितरण सोहळा तब्बल दोन तास सुरू होता. सभेच्या सुरुवातीपासूनच विरोधक आक्रमक होते. मागील ऑनलाईन वार्षिक सभेत ज्यांनी ठराव मांडले नाही, ज्यांनी अनुमोदन दिले नाही, अशा लोकांची वार्षिक अहवालात नावे आली आहेत, तर आम्ही चाळीस मिनिटे बोलूनही दीड ओळीत इतिवृत्तात विषय संपवून राजकारण केले, तसेच मागील सभेची दोन दिवसांत सीडी न दिल्यास तत्कालीन संचालकांकडून 60 हजार वसूल करावे, अशी मागणी केली.

अनेकांना पारितोषिके दिली, सीईओंच्या पीएच्या मुलांचे, अनेकांचे कौतुक झाले. मात्र, माझ्या मुलाला दहावीत 97 टक्के गुण मिळवूनही त्याच्या नावाचे आज प्रमाणपत्र दिले नाही. ग्रामीण भागातील कर्मचारी पारितोषिकापासून वंचित आहेत. खरे बाजूलाच राहिले, अशी संतप्त भावना कैलास भडके यांनी व्यक्त केली.

सभासदांनी एक जुना दाखल देताना जो कर्मचारी 14 लाखांच्या कर्जास पात्र नव्हता, तरीही त्याला ते कर्ज आपला मोठेपणा दाखवण्यासाठी कुणी दिले, असा सवाल उपस्थित केला. त्यावर तत्कालीन 'चेअरमन'नेच उत्तर द्यावे, अशी सभासदांनी मागणी केली. या चर्चेतून यापुढे कर्मचारी पे स्लिप पाहूनच त्याला कर्ज देण्याचा ठराव घेण्यात आला.

पोटनियम दुरुस्त करून सभासद कल्याण निधीसाठी दरमहा 500 रुपये आकारण्याच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा झाली. यावेळी विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. नव्हे, तर कोल्हापूर जिल्हा परिषदेत राबविल्या जाणार्‍या योजनांचे दाखले दिले, तर काही सामान्य सभासदांनी मात्र कोरोनामुळे अनेकांवर वाईट प्रसंग आल्याची आठवण करून देताना सभासद कल्याण निधी पोटनियम दुरुस्तीला सहमती दर्शवली. परंतु, यावर समिती नियुक्त करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सभासद कर्मचार्‍यांसाठी संस्थेने पेन्शन योजना सुरू करावी, कन्यादान योजना इत्यादी विषयांवर चर्चा झाली. व्यासपीठावरून अध्यक्ष शेळके यांच्यासह संजय कडूस, कल्याण मुटकुळे, अरुण जोेर्वेकर आदी संचालकांनी उत्तरे दिली. या सभेत सभासदांचे डिव्हिडंड व कायम निधीवरील व्याजाची रक्कम सभासदांच्या बँक खाती जमा करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सभा संपताच ही रक्कम सभासदांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा झाली.

आम्ही शिक्षकांसारखे नाही, शांततेत घेऊ

सभा सुरू झाल्यानंतर काहीसा गोंधळही वाढला. त्यामुळे शिक्षणाधिकारी कडूस यांनी 'मला पुढच्या कार्यक्रमाला जायचे' असे सांगून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अभय गट यांनी साहेब, शिक्षकांसारखे आम्ही कोणी नाही, आमचे तात्त्विक वाद आहेत. त्यामुळे सभा शांततेत पार पडेल, तुम्ही जावू नका, अशी विनंती केली.

..तर एक-एक खुर्चीही येणार नाही

मी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी येथे आलो होतो. आता गोंधळ होईल म्हणून चाललो नाही, तर मला दुसरा कार्यक्रम आहे आणि सभेसाठी उपस्थित असलेली सभासदांची मोजकी संख्या पाहता मला वाटत नाही येथे गोंधळ होईल. एका एकाच्या वाट्याला एक-एक खुर्चीही येणार नाही, अशी टिप्पणी करताच सभेत मोठा हशा पिकला.

ऑडिट फि मधून पैसे वाटले जातात!

सभेत विकास साळुंखे यांनी संगणक तरतूद चार लाख दाखवली असल्यावर बोट ठेवले़, तर ऑडिसाठी 13 लाख आणि पुन्हा 96 हजार अशा दोन वेगवेगळ्या तरतुदी दाखवल्यावर आक्षेप घेतला. ऑडिटच्या फिमधील पैशांचे कुठे आणि कसे वाटप होते, मला माहिती आहे. त्यामुळे यापुळे ऑडिट देताना दरपत्रक मागावून ते काम देण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.

.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news