पर्यटन शुल्कात तिप्पट वाढ | पुढारी

पर्यटन शुल्कात तिप्पट वाढ

सरुड : पुढारी वृत्तसेवा
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्राच्या पर्यटन शुल्कात तिप्पट वाढ झाली आहे. प्रति पर्यटक माणसी 100 तर 12 वर्षांखालील मुलांना प्रत्येकी 50 रुपये शुल्क आकारले जात आहे. याआधी अनुक्रमे 30 रुपये आणि 15 रुपये शुल्क आकारले जात होते. वाहन कर वगळता मार्गदर्शक (गाईड), कॅमेरा कर आदींमध्ये देखील वाढ करण्यात आल्याची माहिती चांदोली वन्यजीव वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सह्याद्री व्याघ्र राखीव नियामक मंडळाची बैठक झाली. यामध्ये पर्यटन शुल्काच्या वाढीव दर आकारणी पत्रकास नियामक मंडळाची मंजुरी मिळाली आहे.

नियामक मंडळाने चांदोलीसह, सागरेश्वर, राधानगरी आदी अभयारण्य क्षेत्र प्रशासनांना वाढीव पर्यटन शुल्क आकारणीची तत्काळ अंमलबजावणी करण्याबाबत परिपत्रकाद्वारे कळविले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान (317.670 चौ. कि. मी.) आणि कोयना वन्यजीव अभयारण्य (423.550 चौ. कि.मी.) मिळून 741.220 चौ. कि.मी. क्षेत्र (राखीव) हे सन 2010 मध्ये ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आले. आकर्षक ऑर्किड्स वेगवेगळ्या रानवेली, वनस्पती यांच्या विपुल प्रजाती, सस्तन प्राणी, परिसरातील विविध पक्षी, तसेच भ्रमंतीसाठी येणारे हंगामी स्थलांतरित पक्षी, सरपटणारे तसेच उभयचर प्राणी अशा नानाविध पशु-पक्षी, वनस्पतींनी हा प्रदेश संपन्न आहे. वाघाबरोबरच गवे, बिबटे, चितळ, हरीण, सांबर, भेकर, शेखरू हे प्राणी येथे पाहायला मिळतात. कोल्हापूर पासून 80 किलोमीटर तर कराडपासून 60 किलोमीटर अंतर कापून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला भेट देता येते.

व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात दिवसेंदिवस पर्यटकसंख्या वाढत आहे. यामध्ये सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची अधिक गर्दी होते. दुरवरूनही पर्यटकांचा ओढा आहे. व्याघ्र प्रकल्प प्रतिष्ठान व नियामक मंडळाच्या
निर्देशानुसार पर्यटन शुल्कात वाढ झाली आहे.
— नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल, चांदोली वन्यजीव परिक्षेत्र

अशी असेल पर्यटन शुल्क आकारणी

तपशील                जुने शुल्क      नवीन शुल्क
12 वर्षांपुढे            30 रुपये        100 रुपये
12 वर्षाच्या आत     15 रुपये        50 रुपये
गाईड (फी)            200 रुपये      250 रुपये
खा. वाहन              150 रुपये      150 रुपये
कॅमेरा (साधा)         50 रुपये        50 रुपये
कॅमेरा (डीएसएलआर)                 100 रुपये

 

Back to top button