नाशिक : फाळके स्मारक पुनर्निर्माणासाठी ‘जिल्हा नियोजन’कडे प्रस्ताव | पुढारी

नाशिक : फाळके स्मारक पुनर्निर्माणासाठी ‘जिल्हा नियोजन’कडे प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
29 एकरांवर साकारलेल्या फाळके स्मारकाचे पुनर्निर्माण हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर होणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडील पर्यटन निधीअंतर्गत 25 कोटी रुपयांचा निधी मागण्यात येणार असून, महापालिका तसा प्रस्ताव समितीकडे सादर करणार आहे. रामोजी फिल्मसिटीतील कोणकोणत्या बाबी स्मारकात साकारता येऊ शकतात, यासाठी महापालिका सल्लागाराची नियुक्ती करणार आहे.

फाळके स्मारकासंदर्भात तत्कालीन आयुक्त कैलास जाधव यांनी फाळके स्मारक प्रकल्प पीपीपी तत्त्वावर चालविण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. या निविदा प्रक्रियेत एनडीज् आर्ट वर्ल्ड यांचे देकार पात्र ठरले होते. त्यामुळे त्यांना काम देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, लेखापरीक्षकांनी संबंधित व्यवहार हा ठेकेदारासाठी फायद्याचा आणि मनपासाठी आर्थिक नुकसानीचा ठरणार असल्याचा अभिप्राय दिला होता. त्याचबरोबर पालकमंत्री छगन भुजबळ यांनीदेखील मनपातील आढावा बैठकीत या बाबीकडे लक्ष वेधत पीपीपी तत्त्वावर स्मारकाचा विकास करण्याऐवजी स्वत: महापालिकेने हा प्रकल्प साकारावा, अशी सूचना केली होती.

मनपाच हा प्रकल्प साकारेल – मनपा प्रशासनानेदेखील निविदा प्रक्रिया रद्द करत खासगीकरण करण्याऐवजी मनपाच हा प्रकल्प साकारेल, असा संकल्प केला होता. त्यानुसार आता आयुक्त रमेश पवार यांनी प्रयत्न सुरू केले असून, स्मारकाकरिता जिल्हा नियोजन समितीकडूनच निधी मिळविण्याकरिता प्रस्ताव तयार करून तो सादर करणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button