नाशिक : गंगापूरमधून घेणार आरक्षणाचे पाणी

गंगापूर धरण www.pudhari.news
गंगापूर धरण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरासाठी दारणा धरणात आरक्षित केलेले 100 दशलक्ष घनफूट पाणी वापरता येत नसल्याने हेच आरक्षित पाणी गंगापूर धरणातून उचलण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापालिकेने जलसंपदा विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. पाणी उचलण्यास परवानगी मिळाल्यास पिण्याच्या पाण्याचे संकट लांबणीवर पडू शकते. परंतु, परवानगी न दिल्यास जुलै महिन्यात नागरिकांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू शकते.

नाशिक शहरासाठी गंगापूरसह धरण समूहातील कश्यपी आणि गौतमी या धरणांबरोबरच मुकणे धरण तसेच दारणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण केले जाते. त्यातही गंगापूर धरण समूह आणि मुकणे याच धरणातील पाण्याचा वापर दरवर्षी मनपाकडून शहरासाठी केला जातो. जलसंपदा व जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 15 ऑक्टोबर ते 31 जुलै या कालावधीकरता पिण्यासह शेती आणि उद्योगासाठी पाण्याचे आरक्षण केले जाते. यंदा नाशिक शहरासाठी महापालिकेने गंगापूर धरणातून 4000, मुकणेतून 1500 तर दारणा धरणातून 100 दशलक्ष घनफूट असे एकूण 5600 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. आरक्षण धरण्यात आलेल्या पाण्याची मुदत अजून दोन महिने बाकी आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी सध्या गंगापूर धरणात 660, मुकणेत 447 इतके पाणी आरक्षण शिल्लक आहे. दारणा धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याची चेहडी बंधार्‍यातून पंपिंग स्टेशनद्वारे महापालिका उचल करत असते. या बंधार्‍याजवळच वालदेवी व दारणा नदी एकत्रित येते. वालदेवी नदीत देवळाली गावसह परिसरातील गावांचे सांडपाणी मोठ्या प्रमाणात मिसळत असल्याने हेच पाणी पुढे चेहडी बंधार्‍यात येऊन मिळत असल्याने त्या ठिकाणी प्रदूषणामुळे पाण्यात अळ्या तयार होत असल्याने हे पाणी पिण्यासाठी उचलता येत नाही. त्यामुळे दारणा धरणातील 100 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण आजही शिल्लक असल्याने हेच पाणी गंगापूर धरणातून उचलू देण्याची मागणी मनपाने जलसंपदाकडे केली आहे.

1200 दशलक्ष घनफूट आरक्षण शिल्लक
नाशिक शहरासाठी आरक्षित असलेल्या पाणीसाठ्यापैकी आजमितीस गंगापूर, मुकणे व दारणा धरणात 1200 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. दररोज 19 दशलक्ष घनफूट पाणी उचल करून ते नागरिकांना पुरवठा केले जाते. त्यानुसार हाती असलेले 1200 दशलक्ष घनफूट पाणी दि. 31 जुलैपर्यंत नाशिककरांना मिळू शकते. परंतु, दारणातील 100 दशलक्ष घनफूट पाणी गंगापूरमधून उचलण्यास परवानगी नाकारल्यास जुलै महिन्यापासून नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागेल.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news