ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पहिले वसतिगृह सुरू करण्याचे भाग्य लाभले : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी पहिले वसतिगृह सुरू करण्याचे भाग्य लाभले : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे

जामखेड : पुढारी वृत्तसेवा

ऊसतोडणी कामगार महामंडळाची स्थापना करून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी संत भगवान बाबा वसतिगृह हे  पहिले वसतिगृह कर्जत-जामखेडमध्ये सुरू करण्याचे भाग्य लाभले. त्यामुळे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकार करण्याची मला संधी मिळाली, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

जामखेड येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी मंत्री मुंडे बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील, माजी सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, जवळ्याचेे सरपंच प्रशांत शिंदे, स्व. मुंडे प्रतिष्ठानचे काशिनाथ ओमासे, शिवाजी डोंगरे,संदीप ठोंबरे, लहू डोंगरे, बापू राख, अ‍ॅड. प्रवीण सानप, माऊली गोपाळघरे, आदी उपस्थित होते.

मंत्री मुंडे म्हणाले की, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणात आयुष्यभर संघर्ष केला. त्याकाळात मी सावलीसारखा त्यांच्या सोबत राहिलो. तोच संघर्षाचा माझ्याही वाट्याला आला. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा निर्माण व्हाव्यात, ऊस तोडणी कामगारांना न्याय मिळावा; याकरिता आयुष्यभर स्व. मुंडे प्रयत्नशील राहिले. त्याचेी स्वप्न साकार करण्याची संधी मला मिळाली.

ऊसतोडणी कामगार महा मंडळाची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आणि ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याची संधी मिळाली. आमदार पवार म्हणाले, लोकनेते गोपीनाथ मुंडे हयात असते, तर राज्य व देशाच्या राजकारणातील पातळी एवढी खालावली नसती.

स्व. गोपीनाथ मुंडे हेच 2014 चे खरे मुख्यमंत्री होते. विरोधक म्हणून विरोधही झाला असता, पण त्याची पातळी एवढी खालीही गेली नसती, अशा शब्दात पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांवर नाव न घेता टीका केली.

मुंडे यांच्यामुळेच सत्तांतर

मुंडे-पवार यांच्यात वैचारिक मतभेद मात्र समाज हितासाठी ते अनेकदा एकत्र येत होते. ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न त्यांनी एकत्रित येऊन सोडविले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच राज्यात 2014 मध्ये सत्तांतर होऊन भाजपचे सरकार येईल आणि गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होतील, असे वाटत होते. पण दुदैवाने तसे झाले नाही, असे आमदार पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news