गल्लीबोळ चारचाकींनी फुल्ल; अनेक ठिकाणचे कोंडाळे गूल

गल्लीबोळ चारचाकींनी फुल्ल; अनेक ठिकाणचे कोंडाळे गूल

कोल्हापूर : गौरव डोंगरे
रंकाळा स्टँडला येणारे प्रवासी, रंकाळा तलावाकडे जाणारे पर्यटक यांच्यासह खरेदीसाठी नेहमीच गर्दीने फुललेला ताराबाई रोड. शहराच्या ऐतिहासिक वारशांपैकी अंबाबाई मंदिर तसेच रंकाळा तलावाला जोडणारा मुख्य रस्ता याच प्रभागातून जातो. अत्यंत चिंचोळे गल्लीबोळ, गटारींची कामे, दुधाळी परिसरात बसणारा पुराच्या पाण्याचा फटका, गटारींवरील अतिक्रमणे यासह विविध समस्यांनी या प्रभागाला ग्रासल्याचे चित्र आहे. मात्र, प्रभागातील अनेक कोंडाळे सध्या गायब झाल्याचेही दिसून येते आहे.

या प्रभागातील चंद्रेश्वरचे नेतृत्व मागील दहा वर्षे बोंद्रे कुटुंबाकडे आहे. तर त्याआधी सई खराडे यांनीही याच प्रभागातून महापौरपद भूषवले. या प्रभागात समाविष्ट असणारे तटाकडील व दुधाळी या प्रभागांत अनुक्रमे अजित ठाणेकर व प्रताप जाधव यांनी नेतृत्व केले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये 'अ' विभागासाठी सर्वसाधारण महिला तर 'ब' आणि 'क'साठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. यामुळे इच्छुकांची मांदियाळी या प्रभागात दिसून येण्याची चिन्हे आहेत. प्रभागातील रस्ते, गटारींची कामे स्थानिक नगरसेवकांकडून करण्यात आली आहेत. तसेच प्रभागात नियमित संपर्कही आहे. आरक्षणाकडे डोळे लावून बसलेल्या इच्छुकांनीही मागील काही महिन्यांत प्रभागात संपर्क वाढविला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच या प्रभागातील चढाओढ आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत.

कोंडाळे झाले गायब

उभा मारुती चौक, रंकाळा टॉवर, पाडळकर मार्केट, साकोली कॉर्नर, सरस्वती टॉकीज परिसरातील कोंडाळे गायब झाले आहेत. मात्र, याठिकाणी कचरा टाकल्याचे दिसून येते.

काही ठिकाणी डांबरीकरण, काही ठिकाणी प्रतीक्षा

अनेक भागात डांबरीकरण झाल्याचे दिसून येते. गंगावेश हा यातील मुख्य भाग असून त्याठिकाणीही रस्त्याचे काम सुरू आहे. दुधाळी, रंकाळा टॉवर, रंकाळा स्टँड परिसर, ब—ह्मेश्वर पार्क या परिसरातील काही अंतर्गत रस्ते मात्र डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत.

शाळा मोजताहेत अंतिम घटका

नागोजीराव पाटणकर हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, विकास हायस्कूल, राजमाता जिजाऊ हायस्कूल या एकेकाळी प्रसिद्ध असणार्‍या शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. आदर्श प्रशाला सोडल्यास या प्रभागात शिक्षणासाठी मुलांना अन्यत्र जावे लागते. मात्र, सध्या या सर्वच शाळांना उतरती कळा लागली असून याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे जाणवते.

दुधाळी मैदान नेहमीच खडकाळ

दुधाळी या मुख्य मैदानाचा समावेश प्रभागात होतो. परंतु, नेहमीचा खडकाळ, मद्यपींचा उपद्रव, पावसाळ्यात सांडपाणी या समस्यांनी वर्षांनुवर्षे दुधाळी मैदानाला ग्रासलेले आहे. शिवाजी मराठा हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, धुण्याची चावी येथील उद्यान याठिकाणी मुलांना खेळायला तसेच ज्येष्ठांना वॉकची व्यवस्था आहे. पण म्हणाव्या तशा सुविधा येथे दिसून येत नाहीत.

पावसाळ्यात बेहाल

ड्रेनेज लाईन व गटारी अनेक वर्षांपासून 'जैसे थे' असल्याने एका पावसातच या प्रभागातील अनेक भाग जलमय बनतात. यामध्ये प्रामुख्याने साकोली कॉर्नर, सेना ग्रुप, ब—ह्मेश्वर पार्क, कपिलतीर्थ मार्केट, दुधाळीतील काही परिसरात हे पावसाचे पाणी व सांडपाणी अनेक घरात शिरते. गांधी मैदानातून ओव्हर फ्लो होणार्‍या पाण्यामुळे अपना बँकेसमोरील अनेक घरांना मागील दोन वर्षांत पूरसद़ृश

स्थितीचा सामना करावा लागत आहे.

प्रभागातील इच्छुक : इंद्रजित बोंद्रे, प्रताप जाधव, अजित ठाणेकर, माजी महापौर
उदय साळोखे, शिवतेज खराडे, तुकाराम साळोखे, प्रकाश सरनाईक, राजू जाधव, सचिन बिरंजे, धनाजी दळवी, परीक्षित पन्हाळकर, करण शिंदे.

संध्यामठ गल्ली, राजघाट रोड, आयरेकर गल्ली या प्रमुख गल्लींसह प्रभागातील रस्त्यांची कामे दर्जेदार केली आहेत. तसेच जुन्या गटारी काढून नव्याने करण्यात आलेल्या कामांमुळे सांडपाण्याचा प्रश्न कोठेही जाणवत नाही. दहा वर्षांत प्रभागासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
– इंद्रजित बोंद्रे, माजी नगरसेवक

दुधाळी नाला, गटारींचे कामे, पॅव्हेलियनसह शूटिंग रेंज, बॅडमिंटन कोर्ट यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. मागील पाच वर्षांत अधिकाधिक निधी भागात आणला असून प्रलंबित कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.
– प्रताप जाधव, माजी नगरसेवक

तटाकडील तालीम प्रभागासाठी 2 कोटींहून अधिक निधी आणला. भागातील जुनी ड्रेनेज लाईन बदलण्याचे 80 टक्के काम पूर्णत्वास नेले आहे. तसेच अंतर्गत रस्ते, गटारींची कामेही करून
घेतली आहेत.
– अजित ठाणेकर, माजी नगरसेवक

प्रभाग क्रमांक 23 ची व्याप्ती…

रंकाळा टॉवर, जावळाचा गणपती मंदिर, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, रंकाळा स्टॅण्ड, बाबूजमाल परिसर, कसबा गेट, कपिलतीर्थ मार्केट, अवचितपीर, अर्धशिवाजी पुतळा, निवृत्ती चौक, ब्रह्मेश्वर परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, संध्यामठ गल्ली, मर्दानी खेळाचा आखाडा, खराडे कॉलेज, उर्मिला टॉकीज, सरस्वती टॉकीज परिसर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news