अंजनेरी हेही हनुमानाचे जन्मस्थळ, हे सर्वांनी मान्य करावे- आचार्य गंगाधरशास्त्री पाठक | पुढारी

अंजनेरी हेही हनुमानाचे जन्मस्थळ, हे सर्वांनी मान्य करावे- आचार्य गंगाधरशास्त्री पाठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सनातन धर्माच्या कालगणनेनुसार आतापर्यंत 28 चतुर्युगे होऊन गेली आहेत. त्यामुळे प्रत्येक चतुर्युगामध्ये हनुमानाचा जन्म झाला आहे. या गृहितकानुसार आतापर्यंत प्रत्येकवेळी त्रेतायुगामध्ये 28 वेळा हनुमानाचा झाला आहे. यामुळे प्रत्येक वेळी हनुमानाची जन्मतिथी व जन्मठिकाण वेगवेगळे असू शकते. यामुळे नाशिक जिल्ह्यातील अंजनेरी हेही हनुमानाचे जन्मठिकाण आहे, हे सर्वांनी मान्य करावे, असा निर्वाळा अयोध्या येथील रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य आचार्य गंगाधरशास्त्री पाठक यांनी दिला.

कर्नाटकातील हंपी येथील तीर्थक्षेत्र ट्रस्टचे दंडीस्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे येऊन अंजनेरी हे हनुमानाचे जन्मठिकाण नसून हम्पी येथील किष्किंधा येथील गुंफेत हनुमानाचा जन्म झाल्याचा दावा केला होता. तसेच त्यांचे म्हणणे खोडून दाखवण्याचे आव्हान त्यांनी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांना दिले होते. त्यानुसार मंगळवारी (दि.31) नाशिक येथे झालेल्या शास्त्रार्थातून कोणताही निष्कर्ष निघाला नाही, उलट वाद झाला. यामुळे बुधवारी (दि.1) नाशिक येथे रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य गंगाधरशास्त्री पाठक यांच्या उपस्थितीत परत शास्त्रार्थ झाला. यावेळी सुरुवातीला गोविंदानंद सरस्वती यांनी एक देव, एक जन्मभूमी व एक जन्मतिथी यासाठी आपण येथे आल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या बोलण्यानंतर गंगाधरशास्त्री पाठक यांनी या वादाचा निकाल देण्यासाठी कल्प पद्धतीचा अवलंब केला. त्यांनी सनातन धर्माच्या कालगणनेनुसार मनुष्याचे वर्ष, ब—ह्मदेवाचा एक दिवस, चतुर्युग, मन्वंतर या संकल्पना व त्यांची कालगणना सविस्तरपणे सांगितली. या चतुर्युगांचे आवर्तन होत असते. सध्या 28 वे आवर्तन सुरू असून प्रत्येक आवर्तनात त्या-त्या युगातील घटनांची पुनरावृत्ती होत असते, अशी सनातन धर्माची मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानुसार या चतुर्युगाच्या आवर्तनातील त्रेतायुगामध्ये हनुमानाचा 28 वेळा जन्म झाला आहे. यामुळे प्रत्येक वेळी हनुमानाची जन्मतिथी व जन्मठिकाण बदलल्याची शक्यता आहे. यामुळे प्रत्येक युगातील ही ठिकाणे मिळून हनुमानाची जन्म वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याची मान्यता आहे. यामुळे लोकमान्यता असलेल्या प्रत्येक ठिकाणाला मान्यता देणे हे धर्ममान्य असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. यामुळे अंजनेरी हेही हनुमानाचे जन्मठिकाण असल्याचे गोविंदानंद सरस्वती यांनी मानावे, असेही त्यांनी बजावले. यावेळी अनिकेतशास्त्री देशपांडे उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button