Mumbai : नायरेजेरीयनच्या ‘या’ पट्ट्याने मुंबईत माजवली दहशत; उच्च न्यायालयाच्या बाहेरच जीवघेण्या हल्ल्यांचे सत्र | पुढारी

Mumbai : नायरेजेरीयनच्या 'या' पट्ट्याने मुंबईत माजवली दहशत; उच्च न्यायालयाच्या बाहेरच जीवघेण्या हल्ल्यांचे सत्र

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एका नशेबाज नायजेरीयन नागरिकाने 10 ते 12 जणांवर चाकूने हल्ला केला. बुधवारी दुपारी मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात काही पादचार्‍यांसोबत न्यायालयाचे कामकाज उरकून घरी निघालेले काही कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील जखमींवर जी. टी. आणि सर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणी जॉन मेंटी (59) या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. (Mumbai)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या मागच्या बाजूला दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. नशेत असलेल्या जॉन याने सुरुवातीला येथील उद्यानाबाहेर बसलेल्या लोकांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर पदपथावरून ये-जा करणार्‍यांवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. रस्त्यावर समोर येईल त्याच्यावर तो हल्ला करत होता. नागरिकांनी स्वत:चा जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळण्यास सुरुवात केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

काही तरुणांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद करण्याचा प्रयत्न केला. मात्र जॉनने त्यांच्यावरही चाकूने हल्ला केला. घटनेची वर्दी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जॉन याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांनाच धक्काबुक्की करत एका पोलिसावर चाकूने हल्ला केला. अखेर नागरिकांनी एकत्र येत पोलिसांच्या मदतीने त्याला पकडून बेदम चोप दिला. पोलिसांनीही अतिरिक्त कुमक मागवून जॉनला ताब्यात घेत आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आझाद मैदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

जॉनने केलेल्या हल्ल्यात संदिप जाधव, रोलॅड मॅक, हरीलाल रामकुमार, राजू परदेशी, सतीश, शामल गोप आणि अनिल लोंढे यांच्यासह 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सुरुवातीला या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जी. टी. रुग्णालयात दाखल केले. यातील काही गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी सर जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button