

डोळे हे आपल्या मेंदूचाच एक भाग आहे, असे मानले तर चुकीचे होणार नाही. एक क्षणभर डोळे मिटले तर अंधाराचे साम्राज्य पसरते आणि डोळ्यांशिवाय जगणे ही कल्पनाच धक्कादायक वाटते. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. डोळ्यांना होणारी इजा अथवा विकार यामुळे बाह्य पटलावर कायमचा व्रण राहू शकतो किंवा त्यालाच फूल पडणे असं म्हणतात. ज्यामुळे आपली नजर कायमची अधू होऊ शकते.
अलीकडील काळात दुचाकी वाहनांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे हवेमध्ये काळ्या कार्बनचे कण, शिसाचे प्रमाण व विषारी वायू प्रचंड प्रमाणात आढळून येतात. या हवेतील प्रदूषणामुळे आपल्या डोळ्यांमध्ये वाहनांचा धूर, धुलिकण, कार्बनचे कण, तसेच फुलांमधील पुंकेसर असा अनेक प्रकारचा घातक कचरा सारखा व रोजच्या रोज जात आहे. त्यामुळे डोळ्याला अॅलर्जीचा विकार उद्भवतो. याची लक्षणे म्हणजे डोळे लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यात जळजळ होणे, पापण्यांची व डोळ्यांच्या कडांची आग होणे, वारंवार खाज सुटणे अशी आहेत. सतत अॅलर्जीचा त्रास झाल्यास डोळ्यांना कायमचा कोरडेपणा येऊ शकतो. तसेच कारखान्यांमध्ये मशिनच्या घर्षणामुळे वेगाने डोळ्यात गेलेले लोखंडाचे कण, जे कण जर गरम असतील तर डोळ्यांच्या बुब्बुळावर खोलवर रुततात व त्याच्याभोवती त्याचा गंजही रासायनिक प्रक्रियेमुळे जमा होतो. अशा वेळी डोळा न चोळता तो पाण्याने स्वच्छ धुणे हाच उत्तम उपाय आहे.
शहरात व खेडोपाडी रस्ता साफ करणारे, कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावणारे सफाई कामगार, कचरा पालापाचोळा जाळण्याची वाईट सवय, शेतीचा व्यवसाय, रस्ते कच्चे असल्यास उडणारी धूळ, रस्ता साफ नसल्यास चिलटे, कीटक, बुरशीचे कण, प्राण्यांची विष्ठा इत्यादींमुळेदेखील जंतू व इतर डोळ्यांनाही न दिसणारे जंतू, डोळे बिघडवू शकतात. अशावेळी डोळ्यांची निगा राखली नाही तर डोळ्यांच्या बुब्बुळावर पू होऊन अनेक प्रकारची गुंतागुंत होऊ शकते. शिवाय कायमचे अंधत्वही येऊ शकते.
त्यामुळे दुचाकीवरून जाताना संरक्षक हेल्मेट आणि शून्य नंबरचा चष्मा वा गॉगल वापरावा. असे गॉगल किंवा चष्मे डोळ्यांचे अतिनील किंवा अल्ट्रा व्हायोलेट प्रकाशापासून संरक्षण करतात. डोळ्यात कचरा किंवा काही कण गेल्यास खोलगट बशी किंवा प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन आपल्या डोळ्यांची त्यामध्ये उघडझाप करावी.
– डॉ. मनोज कुंभार