कोल्हापूर महापालिका निवडणूक : ओपन प्रभागांतील लढती होणार हाय व्होल्टेज!

शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची तडकाफडकी बदली
शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची तडकाफडकी बदली
Published on
Updated on

कोल्हापूर; सतीश सरीकर : महापालिका निवडणुकीत त्रिसदस्य प्रभाग रचनेमुळे आजूबाजूच्या जुन्या प्रभागांतील मातब्बर उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. 92 पैकी तब्बल 79 जागा ओपन म्हणजे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्ग प्रभागांत तुल्यबळ उमेदवारांचा समावेश असेल. काहींनी आताच रणशिंग फुंकले आहे, तर काहींनी आतापासूनच कार्यकर्त्यांच्या मागणीचा तगादा नको म्हणून अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत; परंतु ओपन प्रभागांत 'हाय व्होल्टेज' लढती होणार हे निश्चित आहे.

शहरातील 31 प्रभागांपैकी 18 प्रभाग पूर्णपणे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत. यामध्ये प्रभाग क्र. 3, 6, 8, 10, 11, 12, 14, 16, 17, 20, 22, 23, 24, 25, 26, 27, 29, 31 यांचा समावेश आहे. नऊ प्रभागांत सर्वसाधारण प्रवर्गातील प्रत्येकी दोन महिला असे आरक्षण आहे. यामध्ये प्रभाग क्र. 6, 8, 11, 16, 22, 24, 25, 27, 29 यांचा समावेश आहे. आठ प्रभाग प्रत्येकी दोन सर्वसाधारण म्हणून असणार आहेत. यामध्ये प्रभाग क्र. 3, 10, 12, 14, 17, 20, 23, 26 यांचा समावेश आहे. या प्रभागांत तुल्यबळ उमेदवारांमुळे निवडणुकीची रंगत वाढणार आहे. यात माजी पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

राजकीय पक्षांना महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी सर्व दृष्टीने सक्षम उमेदवार आवश्यक आहेत. एकेका प्रभागात प्रत्येक पक्षाचे तीन-चार इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवार निवडीसाठी नेत्यांचा कस लागणार आहे. काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप-ताराराणी आघाडीने गेल्या काही महिन्यांपासूनच तशी चाचपणी सुरू केली आहे; परंतु बंडखोरीच्या विचाराने नेतेही चिंतेत आहेत. परिणामी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असले तरी राजकीय पक्षांची नेतेमंडळी कुणालाही शब्द न देता सावध भूमिकेत असल्याचे दिसत आहे.

राजकीय पक्षांच्या सर्वच कार्यकर्त्यांना निवडणूक लढवावी वाटते. त्यासाठी ते तयारीही करत असतात; पण काहीवेळा योग्य आरक्षण नसते. परिणामी दुसर्‍या कार्यकर्त्याला पाठिंबा देऊन निवडून आणले जाते. गेली अनेक वर्षे वाट पाहणार्‍यांना यंदाच्या निवडणुुकीत चांगली संधी चालून आली आहे. परिणामी इच्छुकांची मांदियाळी झाली आहे. अनेकांनी आतापासूनच सोशल मीडियावर आपली उमेदवारी जाहीर केली आहे. काही हौशी इच्छुकांनी स्वतःच पक्षाच्या चिन्हासह अमूक प्रभागातील उमेदवार, असे स्टेटस लावले आहेत.

…म्हणून महापालिकेची सत्ता महत्त्वाची

महापालिकेची सत्ता ताब्यात असेल तर इतर संस्थांच्या नाड्याही हातात राहतात. परिणामी सर्वच पक्षाची नेतेमंडळी महापालिकेवेर सत्तेचा झेंडा फडकविण्यासाठी प्रयत्नशील असतात. गेली दहा वर्षे महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार की स्वतंत्रपणे लढणार, हे अद्याप निश्चित नाही. भाजप-ताराराणी आघाडी एकत्रित लढणार आहे. महापालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू होणार आहे. प्रबळ उमेदवार घेऊन रणनीती आखली जाणार आहे. कारण, विधानसभा निवडणूक, विधान परिषद निवडणूक आणि लोकसभेसाठीही हेच नगरसेवक आणि महापालिकेतील सत्ता नेत्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news