नाशिक : ओझरला चार दिवसांपासून पथदीप बंद | पुढारी

नाशिक : ओझरला चार दिवसांपासून पथदीप बंद

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा
येथील शहर व उपनगरांतील पथदीपांचा वीजपुरवठा महावितरणने खंडित केल्याने चार दिवसांपासून शहर अंधारात आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी व पथदीप सुरू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि. 31) भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

महावितरण कार्यालयाची नगरपरिषदेकडे सुमारे सहा कोटी 29 लाख 54 हजारांची थकबाकी आहे. त्यामुळे नगरपरिषद हद्दीतील पथदीप व पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे दि. 27 ते 31 मे पर्यंत चार दिवस शहर व परिसरातील भाग अंधारात असल्याने जोपर्यंत मुख्याधिकारी येणार नाही, तोपर्यंत जागेवरून हलणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता. मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी आंदोलकांची भेट घेऊन खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत होईल, असे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी जि. प. सदस्य यतिन कदम, दिलीप मंडलिक, नितीन जाधव, डॉ. एन. के. पाटील, किशोर कदम, किशोर ढोकळे, योगेश चौधरी, जगदीश उगले, रोहन देशमुख, प्रशांत गोसावी, कैलास खैरे, राजेंद्र आहेर, रुबीना शहा आदी उपस्थित होते.

पंधरावा वित्त आयोगाचा निधी मिळण्यासाठी मागणी केली असून, त्याची पूर्तता झाल्यानंतर महावितरणची थकबाकी भरण्यात येईल. त्या आधी चालू बिल भरून वीजपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. – किरण देशमुख, मुख्याधिकारी, नगर परिषद, ओझर.

ग्रामपंचायत असताना सगळे सुरळीत असताना आता नगर परिषद झाल्यानंतर तसेच सोबत 26 अधिकारी असताना, शहरात समस्या वाढल्या आहेत. त्यावर तोडगा काढण्यात प्रशासन का अयशस्वी होत आहे हा प्रश्न आहे. – यतीन कदम, विधानसभाप्रमुख, भाजप.

हेही वाचा:

Back to top button