सातारा : अंबेनळी घाट दुरुस्तीसाठी छदामही नाही | पुढारी

सातारा : अंबेनळी घाट दुरुस्तीसाठी छदामही नाही

महाबळेश्‍वर : प्रेषित गांधी
कोकण विभागाला जोडणारा प्रमुख मार्ग असलेल्या महाबळेश्‍वर-पोलादपूरदरम्यानच्या अंबेनळी घाटाची गतवर्षी अतिवृष्टीमुळे अतोनात हानी झाली होती. अनेक दिवस कोकणकडे जाणारी वाहतूक बंद करावी लागली होती. त्यानंतर सुरू झालेली या घाटरस्त्याची कामे आता पावसाळा तोंडावर आला तरी अद्यापही सुरूच आहेत. रस्ता वाहून सर्वाधिक नुकसान झालेल्या हारोशी फाटा ते मेटतळे या 6 कि.मी.च्या घाटमार्गाचे काम पूर्णत्वाकडे गेले असले, तरी अद्यापही सात ठिकाणची कामे पूर्ण व्हायची बाकी आहेत. अंबेनळी घाटरस्त्यासाठी साडेबारा कोटी, तर महाबळेश्‍वर तालुक्यातील रस्त्यांसाठी 64 कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र, त्याचा एक रुपयाही मिळालेला नाही. त्यामुळे प्रमुख मार्गांवरील कामे रखडली आहेत.

महाबळेश्‍वर तालुक्यात गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अंबेनळी घाटरस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली होती. किल्ले प्रतापगड परिसरातील 22 गावांचा संपर्कही तुटला होता. या नुकसानीला आता दहा महिन्यांहून अधिक काळ लोटूनही अनेक कामे निधीअभावी अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. पूरहानीअंतर्गत काही कामे प्रगतिपथावर, तर काही अंतिम टप्प्यात आहेत. एकूण 42 लहान पूल, 110 बॉक्सेलची कामे मंजूर आहेत. मात्र, निधी उपलब्धतेअभावी बहुतांश कामे रडतखडतच सुरू आहेत.

अंबेनळी घाटरस्त्यावर 30 हून अधिक ठिकाणी छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. मेटतळे गावापासून अंदाजे एक ते दोन कि.मी. अंतरावर मुख्य रस्ता 30 फूट खचल्याने वाहतूक पूर्णतः बंद झाली होती. या घाटरस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर आ. मकरंद पाटील यांनी पाहणी करून घाटरस्त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यामुळे प्रारंभी मेटतळेपासून काही अंतरावर 30 फुटांहून अधिक खचलेला मुख्य रस्ता बॉक्सेल, संरक्षक कठडे आदी कामांद्वारे युद्धपातळीवर तयार करण्यात आला. त्यामुळे घाटातील वाहतुकीच्या द‍ृष्टीने असलेला सर्वात मोठा अडथळा सध्या तरी दूर झाला आहेे.

पूरहानीअंतर्गत दोन लहान पुलांची कामे मंजूर झाली. मुख्य घाटरस्त्यावरील संरक्षक कठड्यांसह गॅबियन वॉलची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. अंबेनळी घाटात सद्य:स्थितीत 7 ठिकाणची कामे सुरू आहेत. पावसाळ्यात वाहतूक खंडित होऊ नये अशा कामांना प्राधान्य देण्यात आले असून, 15 जूनपर्यंत ही कामे पूर्ण होण्याचा अंदाज बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला आहे. मोठे नुकसान झालेल्या प्रतापगड रस्त्यावरील दोन पुलांची कामे अद्यापही सुरू आहेत. ही दोन्ही कामेही 15 जूनपर्यंत उरकण्याचा यंत्रणेचा प्रयत्न आहे.

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांतून पूरहानी दुरुस्ती कार्यक्रम 2021-22 अंतर्गत डिसेंबर महिनाअखेर महाबळेश्‍वर तालुक्यास 64 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. अंबेनळी घाटरस्त्यासाठीही साडेबारा कोटी रुपये मंजूर झाले होते. मात्र, यापैकी एक रुपयाही उपलब्ध झालेला नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. ठेकेदाराकरवी प्रमुख कामे उरकण्यावर सध्या भर आहे. राज्यमार्ग ते पार, शिरवली, दूधगाव, झांजवड, देवळी, कळमगाव, कोट्रोशी या रस्त्यांची व लहान पुलांची कामे प्रगतिपथावर आहेत. कोट्रोशी-कळमगाव पूल येत्या चार दिवसांमध्ये पूर्ण होत आहे. बुर्डानी फाटा ते कोट्रोशी (मुकदेव घाट) भागातील तुटलेला रस्ता, भरावाचे काम व गॅबियन वॉलची कामे पूर्ण झाली आहेेत. महाबळेश्‍वर -तापोळा-रामेघर रस्ता तुटलेल्या ठिकाणी संरक्षक भिंतीची कामे तसेच रस्ता डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत.

संपूर्ण पावसाळ्यात अंबेनळी घाटात, आपत्कालीन यंत्रणा राहणार सज्ज

गतवर्षीचा अनुभव पाहता यंदा अंबेनळी घाटातील वाहतूक सुरळीत राहणार का? अतिवृष्टीने पुन्हा नुकसान तर होणार नाही ना? असे प्रश्‍न सतावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण पावसाळा अंबेनळी घाटात दुरुस्तीची व आपत्कालीन मदतीची सर्व महाकाय यंत्रणा सज्ज ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आ. मकरंद पाटील यांनी तशा सूचना दिल्या.

7 ठिकाणची कामे अद्याप सुरूच; 42 लहान पूल, 110 बॉक्सेलची कामे मंजूर

अंबेनळी घाटरस्ता हा ब्रिटिशकालीन असल्याने सध्या गैरसोयीचा व धोकादायक समजला जातो. गतवर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये या घाटरस्त्याचे सर्वाधिक नुकसान झाले होते. सध्या घाटात 7 ठिकाणची कामे सुरू आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी ती पूर्ण करण्याकडे यंत्रणेचा कल आहे. एकूण 42 लहान पूल, 110 बॉक्सेलची कामे मंजूर आहेत. मात्र, निधी उपलब्धतेअभावी बहुतांश कामे रडतखडत सुरू आहेत.

Back to top button