

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आरक्षणाच्या सोडतीनंतर आता महापालिकेचे रणांगण सुरू झाले आहे. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत 31 प्रभागांतील 92 पैकी 53 जागा आरक्षित झाल्या. 39 जागा सर्वसाधारण प्रवर्ग म्हणजे खुल्या राहिल्या आहेत. महिलांच्या एकूण सोळा जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जमातीसाठी एका जागेचे आरक्षण मिळाले. लोकसंख्येनुसार 12 जागा अनुसूचित जाती प्रवर्गाला मिळाल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय ही निवडणूक होत आहे. सर्वच प्रवर्गांत महिलांसाठी 50 टक्के आरक्षणानुसार 46 जागा आरक्षित आहेत. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 6 व सर्वसाधारण प्रवर्गातील 40 महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 6 महिला, अनुसूचित जमाती प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गाच्या 9 महिला या 16 जागांसाठी फक्त आरक्षण सोडत काढण्यात
आली.
53 आरक्षित जागांत अनुसूचित जाती प्रवर्ग 12, अनुसूचित जमाती प्रवर्ग 1 आणि महिलांसाठी 40 जागांच्या आरक्षणाचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण वगळून सोडत काढण्यात आली आहे. परिणामी, सर्वसाधारण प्रवर्गाला 79 जागा मिळाल्या आहेत. बहुतांश माजी नगरसेवकांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. काही ठिकाणी महिला आरक्षण पडले असल्यास त्या ठिकाणी माजी नगरसेवकांकडून कुटुंबातील व्यक्तीची उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षणानंतर आता महापालिका निवडणुकीचे रणांगण खर्या अर्थाने सुरू होणार आहे. अनेक इच्छुकांकडून आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे.
2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 5 लाख 49 हजार 236 आहे. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या 72 हजार 5, तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 2 हजार 989 आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेत त्रिसदस्य प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार 3 नगरसेवकांचे 30 प्रभाग व 2 नगरसेवकांचा 1 असे 31 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या प्रभागांतून 92 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी पहिल्यांदा 12 प्रभागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभाग क्र. 30 (अ), 4 (अ), 19 (अ), 1 (अ), 7 (अ), 13 (अ), 28 (अ), 9 (अ), 21 (अ), 18 (अ), 5 (अ), 15 (अ) यांचा समावेश आहे. यापैकी सहा जागा महिलांना राखीव ठेवण्यासाठी सोडत काढण्यात आली. त्यानुसार प्रभाग क्र. 7 (अ), 4 (अ), 9 (अ), 13 (अ), 28 (अ) व 30 (अ) या जागा अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या. त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्र. 2 (अ) राखीव ठेवण्यात आला. तिथे सोडतीत महिला आरक्षण निघाले नाही. त्यामुळे प्रभाग क्र. 2 (अ) हा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाला. हे आरक्षण न निघाल्याने महिलांचे 50 टक्के आरक्षण पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाला महिलांसाठी 40 जागा मिळाल्या.
सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांचे 1 ते 31 प्रभागांत कुठेच आरक्षण नसल्याने पहिल्यांदा थेट सर्वच प्रभागांत सर्वसाधारण प्रवर्ग महिला असे आरक्षण देण्यात आले. यामध्ये प्रभाग क्र. 1 (ब), 2 (ब), 3 (अ), 4 (ब), 5 (ब), 6 (अ), 7 (ब), 8 (अ), 9 (ब), 10 (अ), 11 (अ), 12 (अ), 13 (ब), 14 (अ) , 15 (ब), 16 (अ), 17 (अ), 18 (ब), 19 (ब), 20 (अ), 21 (ब), 22 (अ), 23 (अ), 24 (अ), 25 (अ), 26 (अ), 27 (अ), 28 (ब), 29 (अ), 30 (ब), 31 (अ) हे थेट सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांना आरक्षित करण्यात आले. त्यानंतर 50 टक्के महिला आरक्षण पूर्ण करण्यासाठी 9 जागा शिल्लक राहिल्याने सोडत काढण्यात आली. त्यासाठी दोन जागा बिनराखीव असलेले प्रभाग बाजूला करण्यात आले. त्यानुसार प्रभाग क्र. 3 (ब), 6 (ब), 8 (ब), 10 (ब), 11 (ब), 12 (ब), 14 (ब), 16 (ब), 17 (ब), 20 (ब), 22 (ब), 23 (ब), 24 (ब), 25 (ब), 26 (ब), 27 (ब), 29 (ब) आदी सतरा प्रभागांतून नऊ जागांसाठी चिठ्ठ्यांद्वारे सोडत काढण्यात आली. त्यानुसार प्रभाग क्र. 27 (ब), 8 (ब), 22 (ब), 11 (ब), 6 (ब), 16 (ब), 24 (ब), 25 (ब), 29 (ब) या प्रभागांतील जागांवर सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले.
महिला आरक्षणानंतर प्रभाग क्र. 12 (ब), 17 (ब), 14 (ब), 3 (ब), 26 (ब), 10 (ब), 20 (ब), 23 (ब) मधील या जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राहिल्या. त्यानंतर प्रभाग क्र. 1 (क), 2 (क), 3 (क), 4 (क), 5 (क), 6 (क), 7 (क), 8 (क), 9 (क), 10 (क), 11 (क), 12 (क), 13 (क), 14 (क), 15 (क), 16 (क), 17 (क), 18 (क), 19 (क), 20 (क), 21 (क), 22 (क), 23 (क), 24 (क), 25 (क), 26 (क), 27 (क), 28 (क), 29 (क), 30 (क), 31 (ब) आदी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आहेत.
आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आरक्षण जाहीर केले. उपायुक्त रविकांत आडसूळ, सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी सोडतीचे नियोजन केले. प्रवर्ग आणि प्रभागानुसार चिठ्ठ्या तयार करून त्या उपस्थितांना दाखवून ड्रममध्ये टाकण्यात आल्या. शालेय विद्यार्थ्यांनी त्यातील एक एक चिठ्ठी काढून डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे देताच त्यांनी आरक्षण जाहीर केले. श्रीमती लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमधील श्रीशैल्य चाळके, निनाद कांबळे, आर्यशीष पाटील, नक्षत्रा बन्ने, स्नेहा गराडे या विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात येत होत्या. केशवराव भोसले नाट्यगृहात आरक्षण सोडत काढण्यात आली.