नाशिक : हनुमान जन्मस्थळाचा चुकीचा प्रचार थांबवा | पुढारी

नाशिक : हनुमान जन्मस्थळाचा चुकीचा प्रचार थांबवा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
हनुमान जन्मस्थळ अंजनेरी नसून किष्किंधानगरी असल्याचा चुकीचा प्रचार महंत गोविंदानंद सरस्वती करत आहे. त्यामुळे हनुमान भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, हा प्रचार थांबविण्यासाठी त्यांच्यावर अटकाव करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत सिन्नरचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना निवेदन देण्यात आले.

महंत गोविंदानंद सरस्वती यांनी चुकीचे विधान केले आहे. या चुकीच्या विधानावरून ग्रामस्थ, साधू, संत, महंत व इतर हनुमान भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, असंतोष निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
त्यांनी यापुढे प्रसारमाध्यमांमध्ये वादग्रस्त विधान करू नये. तसे झल्यास त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी महेश लांडगे, दिनेश उगले, महेश आंधळे, विकी वरंदळ, रमेश आमले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘रथ कर्नाटकमध्ये घेऊन जावा’
कोणीही बाहेरून येऊन आमच्या भावना दुखवू नये व आम्हाला कोणतेही पुरावे व धर्मज्ञान शिकवू नये. अंजनेरी हनुमंतरायांचे जन्मस्थान व पर्यटनस्थळ म्हणून शासनाने निश्चित केलेले आहे व सर्व रेकॉर्ड पुरातत्त्व खात्याकडे आहे. महंत गोविंदानंद सरस्वती यांनी जी रथयात्रा, शोभायात्रा काढली आहे, ती त्वरित थांबविण्यात यावी, रथ कर्नाटकमध्ये घेऊन जावा, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी मुटकुळे यांच्याकडे केली.

हेही वाचा :

Back to top button