नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याप्रवणक्षेत्र ठरलेल्या गिरणारे परिसरात सोमवारी (दि. 30) बिबट्याची जोडी वनविभागाच्या पिंजर्यात अडकली. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. गिरणारे परिसरातील बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्याच्या चार घटना घडल्या आहेत. त्यात एका सहावर्षीय चिमुकलीसह शेतमजुराला आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
त्या पार्श्वभूमीवर गिरणारे परिसरात पिंजरे तैनात करण्यात आले होते. वाडगाव आणि दुगाव शिवारात लावलेल्या पिंजर्यात एक नर व एक मादी जेरबंद झाले आहे. त्यांचे अंदाजे वय 4 ते 5 वर्षे असून, त्यांना लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याचे वरिष्ठ वनाधिकार्यांनी सांगितले.