UPSC Result 2022 : नाशिक जिल्ह्यातील चौघांनी मारली बाजी | पुढारी

UPSC Result 2022 : नाशिक जिल्ह्यातील चौघांनी मारली बाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात नाशिक जिल्ह्यातील चौघांनी बाजी मारली आहे. (UPSC Result 2022)

भारतीय रेल्वे सेवेसारख्या प्रतिष्ठित सेवेसाठी निवड झाल्यानंतरही त्यावर समाधान न मानता सनदी सेवेचे स्वप्न पूूर्ण करणार्‍या नाशिकच्या स्वप्नील पवारची करिअर एक्स्प्रेस सुसाट निघाली आहे. स्वप्नीलने संपूर्ण देशात 418 वी रँक मिळवत यश खेचून आणले आहे. वडील रिक्षाचालक आणि आई गृहिणी असलेला स्वप्नील मैलाचे एकेक दगड सहजगत्या मागे टाकतो आहे. कमालीच्या प्रतिकूल परिस्थितीतही अभ्यासातील सातत्य आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात, हे त्यानेे एकदा नव्हे तर दोनदा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवून दिले आहे. मूळचे भगूरचे; पण चार पिढ्यांपासून नाशिकमध्येच स्थायिक झालेल्या पवार कुटुंबात वडील जगन्नाथ पवार, आई कल्पना, मुलगी पूजा आणि सर्वांत धाकटा स्वप्नील असे चार सदस्य. द्वारका परिसरातील टाकळी रोड भागात त्यांचे सध्या वास्तव्य आहे. (UPSC Result 2022)

मूळचा नाशिकचा असलेला अक्षय वाखारे याने यूपीएससी परीक्षेत 203 रँक मिळवित यश नोंदविले आहे. अक्षयचे वडील नाशिकरोडच्या करन्सी नोटप्रेसमध्ये नोकरीला असून, आई गृहिणी आहे. त्याने पुण्यात मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग केले आहे. 2015 पासून अक्षय पुण्यात असतानाच, इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. यापूर्वी अक्षयने दोन वेळा स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यात त्याला अपयश आले होते. अखेर 2021 मध्ये त्याने दिलेल्या परीक्षेत यश आले. या दरम्यान कोरोनाच्या कठीण काळात अक्षयने परीक्षेची तयारी करून यश मिळविल्याचा आनंद त्याने व्यक्त केला.

प्रशांत डगळेला 583 रँक
नाशिकरोड येथील प्रशांत डगळे याने यूपीएससी परीक्षेत 583 रँक मिळवित यश नोंदविले. नाशिकमध्ये राहूनच प्रशांत याने यूपीएससी परीक्षेची तयारी केली. एम.एस्सी. (फिजिक्स) शिक्षण घेत असतानाच त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. प्रशांतचे वडील कृषी विभागातील उंटवाडी येथील कार्यालयात ते कृषी पर्यवेक्षक या पदावर आहेत.

मालेगावचा अपूर्व अस्मर चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण

प्रयत्न, चिकाटी आणि चुकांवर उपाययोजना करत यश हमखास गाठता येते, याचे उदाहरण मालेगावच्या अपूर्व धनंजय अस्मर याने विद्यार्थ्यांसमोर ठेवले आहे. अपूर्वने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चौथ्या प्रयत्नात यश (रँक 558) गाठत उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

शहरातील सहकार, राजकारण, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील सुपरिचित अस्मर कुटुंबातील अपूर्व अस्मर हा दिवंगत हरिलाल अस्मर यांचा नातू आहे. वडील धनंजय हे व्यावसायिक, तर आई शुभांगी या काकाणी विद्यालयात शिक्षिका आहेत. याच शाळेत अपूर्वचे माध्यमिक शिक्षण झाले. प्राथमिक शिक्षण हे वर्धमान शाळेत झाले. पुण्यातील एस. पी. महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तेथीलच ‘एमआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मधून संगणक अभियंता ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर मात्र प्रशासकीय अधिकारी व्हायचे, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्पर्धा परीक्षांचा मार्ग निवडला. एक-दोन नव्हे तर तीन वेळा अपयश आले. कधी प्रीलिम, कधी मेन, तर कधी तोंडी परीक्षेत कस लागला. मात्र, घरच्यांचे पाठबळ असल्याने आणि आत्मविश्वास अधिक दुणावल्याने तयारीत खंड पडू दिला नाही.

आवडीचे क्षेत्र आणि त्यासाठी प्रत्येक कसोटीला सामोरे जाण्याच्या तयारीने यश जास्त दिवस हुलकावणी देऊ शकत नाही, या विश्वासाने चौथ्यांदा 2021 मध्ये दिलेल्या परीक्षेत यश हाती आले. 9 मे रोजी तोंडी परीक्षा झाली. त्यातही बाजी मारत 558 वी रँक प्राप्त केली. या यशाबद्दल अपूर्वचे कौतुक होत आहे.

हेही वाचा :

Back to top button