

नाशिक (नांदुर-शिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील नांदुर-शिंगोटे येथील एकलव्य नगर याठिकाणी असलेल्या आदिवासी वस्तीवरील सोमनाथ महादू मेंगाळ (45) यांच्यावर सोमवारी (दि. 30) सकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. तथापि मेंगाळ यांनी धैर्याने बिबट्याच्या जबड्यातून स्वतःची सुटका करून घेतली. त्यांनी केलेल्या कडव्या प्रतिकारानंतर बिबट्याने शेताकडे धूम ठोकली.
सकाळी झोपेतून उठल्यानंतर सोमनाथ मेंगाळ आपल्या वस्ती जवळील विहिरीकडे फेरफटका मारण्यासाठी जात होते. रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यांच्या जोडीपैकी एकाने मेंगाळ यांच्यावर हल्ला केला. मात्र मेंगाळ यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पूर्ण ताकतीनिशी बिबट्याचा प्रतिकार केला.
मेंगाळ यांनी कडवी झुंज दिल्यामुळे बिबट्याने शेताकडे धूम ठोकली. परिणामी किरकोळ जखमांवर निभावले.
हल्ल्यानंतर एक बिबट्या डोंगराकडे व एक सोमनाथ शेळके यांच्या मकाच्या शेतामध्ये पळून गेला. मेंगाळ हे स्वतःला सावरत आपल्या वस्तीकडे आल्यानंतर आई वडिलांना व पत्नीला त्यांनी आपल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती दिली.
या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी परिसराची पाहणी करून शेतकऱ्यांना सावधानतेची इशारा दिला. या भागात मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर असून पाण्याच्या व भक्ष्याच्या शोधार्थ बिबटे आता मानवी वस्तीकडे येत आहेत.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर आदिवासींच्या वस्त्या असून त्यांचे पाळीव कुत्रे बिबट्यांनी फस्त केलेले आहे. शेतकऱ्यांना पशुधनाची काळजी घ्यावी लागत आहे. त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सोमनाथ मेंगाळ तसेच ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम गिरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.