नाशिक जिल्ह्यात अठरा दिवसांत तब्बल सोळा खून, ‘ही’ आहेत कारणे | पुढारी

नाशिक जिल्ह्यात अठरा दिवसांत तब्बल सोळा खून, 'ही' आहेत कारणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहर आयुक्तालय व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दि. 11 ते 29 मे दरम्यान 16 जणांचे खून झाले आहेत. त्यात एका स्त्रीसह 15 युवक व पुरुषांचा किरकोळ कारणांवरून किंवा संतापाच्या भरात खून झाले आहेत. यातील बहुतांश आरोपी गजाआड असले, तरी क्षुल्लक कारणावरून किंवा संतापाच्या भरात जिवे मारण्याचे प्रकार वाढल्याने हा एक चिंतेचा विषय झाला आहे.

शहरात गत 13 दिवसांत कौटुंबिक कारणांतून, कुरापत काढून किंवा क्षणिक रागाच्या भरात सहा जणांचा खून झाला आहे, तर ग्रामीण भागातही दि. 11 ते 29 मे दरम्यान 10 खून झाले आहेत. जिल्ह्यातील 16 पैकी सात खून हे कौटुंबिक कारणांमधून झाले आहेत. त्यात दोन मुलांचा त्यांच्याच वडिलांनी, पती-पत्नींनी एकमेकांचा खून केला आहे, तर इतर खून मित्र, अनैतिक संबंध, चेष्टामस्करी, क्षणिक कारणांतून झाले आहेत. त्यामुळे कौटुंबिक व सार्वजनिक ठिकाणावरील हिंसा वाढत असल्याची चिंताजनक बाब समोर येत आहे. खुनासोबतच जिवे मारण्याचा प्रयत्न, हाणामारीचे प्रकारही सर्रास घडत असून, याप्रकरणीही दररोज गुन्हे दाखल होत आहेत.

राग ही नैसर्गिक भावना आहे. मात्र, ती योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. रागामुळे स्वत:सह समोरच्याचे नुकसान होत असते. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मानसिक स्वास्थ्य जपले पाहिजे. त्यासाठी चांगली जीवनशैली आत्मसात केली पाहिजे. तसेच आत्मपरीक्षण करणे, इतरांशी संवाद साधणे, आवश्यकता भासल्यास मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घेणे
गरजेचे आहे.
– डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचारतज्ज्ञ,
माजी अध्यक्ष, आयएमए

ही आहेत कारणे
रागीट स्वभाव, अनैतिक संबंध, वाद मिटवण्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न, कपड्यांवर पाणी उडते असे सांगितल्याने वाद, वाहनाचा कट लागल्याची कुरापत काढून, जागेच्या-आर्थिक वादावरून मारेकर्‍यांनी खून केले आहेत.

हेही वाचा :

Back to top button